नागपूर : पोलीस भरती दरम्यान होणारी परीक्षा पुढे ढकलली म्हणून वैतागलेल्या उमेदवारांनी जोरदार गोंधळ घातला. नागपूरच्या पोलीस मुख्यालयात हा प्रकार घडला. शारिरीक चाचणी झाल्यावर सलग तिसऱ्यांना लेखी परीक्षा पुढे ढकलल्याने उमेदवार संतापले. मात्र या उमेदवारांना योग्य उत्तर देण्याऐवजी दंगल विरोधी पथकाला पाचारण करण्यात आलं.
मोठ्या संख्येने एकत्रित झालेल्या तरूणाईचा हा गोंधळ आणि हवेत उडणाऱ्या पेपर मिसाईलकडे पाहिल्यावर हे एखाद्या महाविद्यालयाचं स्नेह संमेलन असेल असं वाटेल. पण हे तसं नाही. प्रत्यक्षात पोलीस भरती दरम्यान झालेला गोंधळ आहे. याआधी १९ आणि २२ एप्रिलला आणि १० मेला परीक्षा होणार होती. पण ऐनवेळी दुष्काळामुळे ती पुढे ढकलण्यात आली.
आता मराठवाडा, कोकण अशा दूरदूरच्या प्रांतातून आलेल्या उमेदवारांना पुन्हा घरी परतावं लागतंय. भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना प्रत्येकवेळचा हा प्रवासाचा खर्च झेपत नाही, आणि मनस्ताप होतो तो वेगळाच.
आता पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि उमेदवारांना १६ मे या दिवशी येण्यास सांगण्यात आलं. त्यावरून ३००० च्या संख्येने आलेली तरूणाई वैतागली. त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी जोरदार गोंधळ घातला.
मात्र या उमेदवारांना काही योग्य उत्तर देण्याऐवजी पोलिसांनी दंगल विरोधी पथकालाच पाचारण केलं. दरम्यान जागांची नवी भरती करण्याचे आदेश देण्यात आले ते उमेदवारांपर्यंत पोहोचले नसल्याचं उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलंय.
एकीकडे बेरोजगारी आणि दुसरीकडे नोकरीचा एकमेव पर्याय पोलिस भरतीच्या माध्यमाने असल्याने, तरुणांमध्ये हा रोष जाणवला. पण किमान आतातरी १७ मेला परीक्षा व्हावी अशीच इच्छा व्यक्त करण्यात येत आहे.