विशाल करोळे, औरंगाबाद : एरव्ही चोरीला गेलेली वस्तू परत मिळत नाही असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. मात्र, औरंगाबाद पोलिसांनी नागरिकांना आज सुखद धक्का दिला. शहरवासीयांचा जवळपास 51 लाखांचा चोरीला गेलेला ऐवज पोलिसांनी आज एका नागरी कार्यक्रमात जनतेला परत दिला.
गेल्या वर्षभरात शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरीला गेलेला मुद्देमाल औरंगाबाद पोलिसांनी जनतेला परत केला. जवळपास 51 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जनतेला परत केलाय. यात 12 लाखांवर रोख रक्कम, दोन लाखांचं सोनं, 54 मोबाईल हँडसेट, 55 गाड्यांचा यात समावेश आहे. यामध्ये, एका शेतकऱ्याचे चोरील गेलेल्या 11 लाखांचाही समावेश आहे. मुद्देमाल परत मिळालेल्या लोकांनी यासाठी पोलिसांचे खास आभार मानलेत.
विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत हा सर्व ऐवज परत करण्यात आला. बागडे यांनी पोलिसांच्या या कौतुकास्पद अभियानाचं खास कौतुक केलंय. तर ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय.
पोलिसांची ही मोहिम निश्चितच कौतुकास्पद आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळणं यासारखा दुसरा आनंद नाही. पोलिसांनी सुद्धा हे काम असंच सुरू ठेवावं हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.