पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये अनेक गृहनिर्माण सोसायट्यांचं लेखापरिक्षणच गेल्या २० ते २५ वर्षांपासून झालं नसल्याचं उघड झालंय. वेळेत लेखापरिक्षण करून घेतलं नाही तर या संस्थांची नोंदणी रद्द करण्याचा इशारा उपनिबंधक सहकारी संस्थेने दिलाय.
पिंपरी चिंचवडमध्ये आधीच अनधिकृत बांधकामात राहणारे नागरिक संकटाच्या छायेत आहेत. त्यातच आता अधिकृत असलेल्या अनेक सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांवरही संकटाची टांगती तलवार आहे. शहरातल्या हजारो गृहनिर्माण संस्थांनी लेखापरिक्षणच केलं नसल्याचं स्पष्ट झालंय. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या समाप्तीपासून चार महिन्यांच्या आत लेखापरिक्षण करून घेणं बंधनकारक असतं, पण शहरातल्या बहुतांश संस्थांनी त्याकडे डोळेझाक केलीय.
सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांच्या अंतर्गत कुरबुरी, वाद यामुळे लेखापरिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. लेखापरिक्षणाचा खर्च टाळण्याकडेही अनेकदा कल दिसून येतो. शहरातल्या अडीच हजार सोसायट्यांना या संदर्भात नोटीसा देण्याची तयारी सुरू झालीय.
आत्तापर्यंत शहरात ८६७ सोसायट्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहे. लेखापरिक्षण करण्यासाठी काही महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीमध्ये लेखापरिक्षण केलं नाही तर त्या संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.