पुण्याचा 'पिरिअड मॅन' बनलाय 'सदिच्छा दूत'!

महिलांची मासिक पाळी विषयावर आज ही आपल्याकडे खुलेपणानं बोललं जात नाही. त्याबाबतीत आज ही अनेक समज, गैरसमज आहेत. पिंपरी - चिंचवडमधल्या एका युवकानं याच बाबतीत जनजागृती सुरु केलीय... आणि त्याची दखल अंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आलीय. आज त्याला 'पिरिअड मॅन' म्हणून ओळखलं जातय.

Updated: Apr 2, 2016, 09:02 PM IST
पुण्याचा 'पिरिअड मॅन' बनलाय 'सदिच्छा दूत'! title=

कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : महिलांची मासिक पाळी विषयावर आज ही आपल्याकडे खुलेपणानं बोललं जात नाही. त्याबाबतीत आज ही अनेक समज, गैरसमज आहेत. पिंपरी - चिंचवडमधल्या एका युवकानं याच बाबतीत जनजागृती सुरु केलीय... आणि त्याची दखल अंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आलीय. आज त्याला 'पिरिअड मॅन' म्हणून ओळखलं जातय.

पिंपरीच्या एच ए वसाहतीत राहणारा प्रविण निकम... पुणे परिसरातील झोपडपट्टयांमध्ये जाऊन हा अवलिया स्त्रियांच्या 'मासिक पाळी' या संवेदनशील विषयावर जनजागृतीचं काम करतोय... होय पुण्यातला एक तरुण हे काम करतोय आणि तेही वयाच्या 18 वर्षांपासून... आपल्या 'रोशनी' या एनजीओच्या माध्यमातून... 

आंतरराष्ट्रीय दखल... 

त्याच्या या अभिनव कार्यक्रमाची दखल फक्त राष्ट्रीयच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आलीय. केंद्र सरकारकडून त्याला राष्ट्रीय युवा पुरस्कार देण्यात आला तर संयुक्त राष्ट्रानं त्याला 'सदिच्छा दूत' बनवलं आणि त्याला पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. इतकंच नाही तर त्याला इंग्लंडच्या राणीनंही भेटायला बोलावलं... राणीची भेट अविस्मरणीय असल्याचं तो सांगतो…!  

चिमुरड्या 'रोशनी'नं दिली नवी दृष्टी!

प्रविणचा हा प्रवास कसा सुरु झाला यामागेही एक रंजक कथा आहे. इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत असताना तो आसामला गेला होता, तिथं त्याला रोशनी नावाची चौदा पंधरा वर्षांची मुलगी भेटली. ती शाळेत जात नव्हती. रोशनीला मासिक पाळी सुरु झाल्यामुळं तीची शाळा बंद झाल्याचं त्याला समजलं आणि तो थक्क झाला. या एका घटनेनं प्रविणच आयुष्यच बदलून टाकलं.

तो परत आला, त्यानं या विषयावर अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं की जवळपास २५ टक्के मुलींना मासिक पाळी सुरु झाल्यामुळे शाळा सोडावी लागते. त्यानं याच विषयावर काम करण्याचा निर्णय घेतला आणि रोशनीच्याच नावे 'रोशनी' नावाची एनजीओ सुरु केली. आपल्या या कामासाठी त्यानं इंजिनीअरिंगचं शिक्षणही सोडलं.

अनेकांच्या डोळ्यावर असलेली भूरसटलेल्या विचारांची झापड दूर करण्याचं मोलाचं काम हा तरुण करतोय. ज्या विषयावर आज ही बोलन टाळल जातं त्या विषयवार प्रविण काम करतोय. त्याची 'पिरीअड मॅन' म्हणून ओळख होते आणि त्याचा त्याला अभिमान आहे... आणि आम्हालाही...