पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशानंतर आता आपला मोर्चा सोन्याकडे वळविला आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा अधिक सोने बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पण याला अपवाद म्हणून पनवेलचे गोल्डमॅन जगदीश गायकवाड यांनी आपले सोने त्याग करून ते दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोदींच्या निर्णयाचे स्वागत करून मी कधीच सोने घालणार नाही, असे चंगच त्यांनी बांधला आहे.
पनवेलमध्ये राहणारे जगदीश गायकवाड हे नवी मुंबईतील गोल्डमॅन म्हणून प्रसिद्ध आहेत. गायकवाड यांच्या अंगावर सुमारे तीन ते चार किलो सोने असते अशी चर्चा नेहमीच केली जाते. पण आता गायकवाड यांनी मोदींसाठी सोन्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.
मोदींच्या या निर्णयामुळे परदेशातून आयात होणा-या सोन्याचे प्रमाण कमी होईल आणि पैशांचीही बचत होईल असे गायकवाड सांगतात. सरकारच्या निर्णयाचे समर्थन करण्यासाठीच मी आता सोन्याचा त्याग केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
गेल्या २५ वर्षांपासून गायकवाड हे सोने घालत होते. सोन्याचा त्याग करुन गायकवाड थांबलेले नाही. याऊलट त्यांनी स्वतःकडील सोने आता दान करण्याचा निर्णयही घेतला आहे. माझ्या जवळील सोने मी गावातील मंदिरात दान केले असून उर्वरित सोने नातेवाईक आणि वारसदारांमध्ये वाटणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.