पानसरेंच्या पत्नीनं 'त्या' हल्लेखोरांना पाहिलंय, स्केच बनवणार

कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास वेग घेत आहे. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्याचं काम पोलिसांनी सुरू केलंय. 

Updated: Feb 17, 2015, 07:20 PM IST
पानसरेंच्या पत्नीनं 'त्या' हल्लेखोरांना पाहिलंय, स्केच बनवणार title=

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास वेग घेत आहे. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्याचं काम पोलिसांनी सुरू केलंय. 

पानसरे यांच्या पत्नीवरही हल्ला झाला होता. त्यांना एक गोळी लागली होती. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीला धोका नाही. उमा पानसरे यांनी हल्लेखोरांना जवळून पाहिलंय. त्यांच्याकडून माहिती घेऊन आता हल्लेखोरांचं स्केच बनवण्याचं काम सुरू आहे.
 
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, ते हळूहळू शुद्धीवर येत आहेत. ते थोडं थोडं बोलतायत. त्यांना सध्या व्हेन्टिलेटरवर ठेवलंय, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलीय. 

'चळवळीतल्या कार्यकर्त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न'
दरम्यान, कोल्हापूरमध्ये कॉम्रेड पानसरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ विविध ठिकाणी सामाजिक संघटनांनी निषेध मोर्चा काढला होता. कोल्हापूर आणि नाशिकमध्ये निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला तुफान प्रतिसाद मिळाला. चळवळीतल्या कार्यकर्त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास सहन केलं जाणार नाही, असा इशारा देण्यात आला. 

पानसरेंवरील हल्ल्याचा तपास योग्य दिशेनं सुरू नसल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. 

अंनिसचे दिवंगत संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी शैला दाभोलकर यांनीही गोविंद पानसरेंवरील हल्ल्याचा निषेध केलाय. पानसरे यांच्या हल्लेखोरांचा छडा लवकरात लवकर लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांबाबत नाराजीही व्यक्त केलीय. मुख्यमंत्री फोन उचलत नाहीत. तपासाबाबत त्यांच्यापुढे काही मुद्दे मांडायचे आहेत. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचं शैला दाभोलकर यांनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.