नाशिक : रब्बी कांद्यापाठोपाठ खरीपाच्या लाल कांद्यानेही शेतकऱ्यांना साथ दिलेली नाही. त्यामुळे आशिया खंडातली कांद्याची सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, लाल कांदा अवघा एक रुपये किलो दराने विकला गेलाय.
महाराष्ट्राप्रमाणेच गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानातही लाल कांद्याचं उत्पन्न चांगलं आलंय तसंच निर्यातीच्या बाबतीत सततच्या बदलत्या धोरणामुळे निर्यात थंडावलेलीच आहे. तर टोमॅटो उत्पादकांना नवनवीन संकटांना सामोरं जावं लागतंय. जेवणात चव आणणा-या टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात पडलेत.
नागपुरातील मुख्य बाजारात 2-3 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री होतेय. बाजारात अवाक वाढल्याने आणि वातावरणात झालेल्या बदलाने ही परिस्थिती निर्माण झाल्याचं बोललं जातंय. तर बटाट्याचीही आवक वाढल्याने बटाट्याचे भावही कमालीचे कोसळलेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत जुना बटाटा 2 ते 4 रूपये किलोने तर नवा बटाटा 5 ते 6 रूपये किलोने विकला जातोय. राज्यात तसंच हरयाणातून बटाट्याची आवक वाढल्याने, तसंच साठवणूक केलेला बटाटाही मोठ्या प्रमाणात बाहेर आल्याने बटाट्याचे भाव कोसळलेत.