पोकर्णांची भाजपात उडी... चव्हाणांना झटका

राज्यात मोदी सरकारची 'पुण्यतिथी' साजरी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना नांदेड मधूनच मोठा झटका बसलाय. 

Updated: May 26, 2015, 08:23 PM IST
पोकर्णांची भाजपात उडी... चव्हाणांना झटका title=

नांदेड : राज्यात मोदी सरकारची 'पुण्यतिथी' साजरी करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना नांदेड मधूनच मोठा झटका बसलाय. 

नांदेड जिल्ह्यातल्या राजकारणात मोठं वलय असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज भाजपात प्रवेश केलाय. 

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते. नंतर पोकर्णा यांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचीही भेट घेतली. 

गत विधानसभा निवडणुकीत ओमप्रकाश पोकर्णा यांचा पराभव झाला होता. ऐन वेळी अशोक चव्हाणांचे खंदे समर्थक काँग्रेसचे शहराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांनी भाजपात प्रवेश करुन उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली होती. पण, अशोक चव्हाणांनी त्यावेळी कुठलीही भूमिका घेतली नव्हती. शिवाय काँग्रेसनं पोकर्णा यांना निवडणुकीत साथ दिली नव्हती. त्यामुळे पोकर्णा अस्वस्थ होते. तेव्हापासून ते भाजपात जाण्याच्या मनसुब्यात असल्याच्या बातम्या होत्या.

यात 'की फॅक्टर' ठरले काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणारे अशोक चव्हाणांचे मेव्हणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर... त्यांच्याच नेतृत्वाखाली पोकर्णा यांनी आज भाजपात प्रवेश केला. जिल्ह्याच्या राजकारणात पोकर्णा यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांसाठी हा मोठा झटका आहे...
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.