पुणे: ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यावर आज दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लक्ष्मण यांचं सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास दीर्घ आजारानं निधन झालं.
लक्ष्मण यांचं स्मारक बनविण्यात येणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज सकाळी राज्य सरकारकडून त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सकाळी त्यांचं पार्थिव सिंबायोसिस महाविद्यालयाच्या परिसरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्मण यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना फुफ्फुस आणि किडनीचा त्रास होत होता. काही दिवसांपूर्वी त्यांचे डायलिसिसही करण्यात आले होते. गेल्या नऊ दिवसांपासून लक्ष्मण यांना ‘आयसीयू‘मध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालविली. लक्ष्मण यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
‘कॉमन मॅन‘ला जन्म देणारे व्यंगचित्रकार म्हणून आर. के. लक्ष्मण यांची ओळख आहे. २०१० मध्ये त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नीट बोलताही येत नव्हतं. मात्र, तरीही त्यांनी व्यंगचित्र रेखाटणं सुरूच ठेवलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.