श्रीरामपूर: शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणारे रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रावसाहेब शिंदे यांचे सोमवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. शिंदे यांच्या निधनानं रयत शिक्षण संस्थेचा आधारवड हरपला अशी भावना व्यक्त केली जात आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं म्हणून रयत शिक्षण संस्थेचं जाळं तयार केलं होतं. त्यांच्या पश्चात रावसाहेब शिंदे यांनी समर्थपणे ही धूरा पेलली आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आभाळाकडे झेप घेता यावी म्हणून त्यांनी दिशादर्शक प्रकल्प, ग्रंथालय, कॉलेज अशा सुविधा त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांसाठी शिंदे यांनी संगमनेरमध्ये आदर्श वसतीगृह उभारले. तसंच श्रीरामपूरमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापनाही केली. गेल्या अनेक वर्षांपासून ते रयत शिक्षण संस्थेत कार्यरत होते.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमधील पाडळी या गावात रावसाहेब शिंदे यांचा जन्म झाला होता.शिक्षणासोबतच शेती आणि गोपालन या क्षेत्रातही ते सक्रीय होते. राष्ट्र सेवा दलात सक्रीय असलेल्या शिंदे यांनी स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला होता. यासाठी त्यांना दोन वेळा तुरुंगवास भोगावा लागला. भूमिगत राहून १९४२ च्या स्वातंत्र्यसंग्रामात गुप्त बैठका घेणं आणि बुलेटिन काढणं असे कामही त्यांनी केले. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास रावसाहेब शिंदे यांचा ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. त्यांच्यावर आज दुपारी श्रीरामपूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.