मुलगी शिकली, `गुन्हेगारी वाढली`!

विविध गुन्ह्यांखाली ९१ हजार महिलांना अटक त्यापैकी १९०० महिलांनी केले `मर्डर` महिलांमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 12, 2013, 07:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुलगी शिकली, प्रगती झाली... याची प्रचिती जागोजागी पाहायला मिळते. आज एकही असं क्षेत्र नाही, जे महिलांनी काबीज केलेलं नाही. परंतु आता गुन्हेगारीच्या आघाडीवरही महिलांची प्रगती फास्ट व्हायला लागलीय. गेल्या तीन वर्षांत विविध गुन्ह्यांखाली तब्बल ९१ हजार महिलांना अटक झालीय. महिलांचं हे बदललेलं रूप धक्कादायक आहे...
विविध गुन्ह्यांखाली ९१ हजार महिलांना अटक
त्यापैकी १९०० महिलांनी केले `मर्डर`
महिलांमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेय...
महिलांवरील वाढत्या अत्याचारांची चर्चा नेहमीच होते. परंतु नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालातून एक धक्कादायक वास्तव समोर आलंय... अबला समजल्या जाणा-या महिलांमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०१० ते २०१२ या काळात महाराष्ट्रात सुमारे ९१ हजार महिलांना विविध गुह्यांखाली अटक झालीय.
एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०१० मध्ये महाराष्ट्रात महिला गुन्हेगारांची संख्या ३० हजार११८इतकी होती. २०११ मध्ये ३० हजार १५९ आणि २०१२ मध्ये ३० हजार ६०७ इतकी होती. यापैकी तब्बल १ हजार ९०० महिलांना चक्क हत्यांच्या गुन्ह्यांमध्ये तर १ हजार ७०० जणींना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. या ९१ हजार महिला गुन्हेगारांपैकी २० हजार जणींना चक्क आपल्या पतीराजांवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आलीय. १६ हजार ८४३ जणींना हाणामारी करणे, १५ हजार ३४८ जणींना हल्ला करून जखमी करणे आणि ३ हजार ९११ महिलांना चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सध्याच्या घडीला ठाणे-मुंबईत ७ हजार २६४ महिला गुन्हेगार असल्याचं अहवालात म्हटलंय.
महिलांच्या गुन्हेगारीत भारतात महाराष्ट्राचा अव्वल क्रमांक लागतो. महाराष्ट्रापाठोपाठ आंध्र प्रदेशमध्ये ५७ हजार ४०६ महिला गुन्हेगारी क्षेत्रात आहेत. मध्य प्रदेशात हाच आकडा ४९ हजार ३३३ इतका आहे. गुजरातमध्ये ४१ हजार ८७२ महिलांना अटक झाली होती. राष्ट्रीय स्तरावरील ९३ टक्के पुरुष गुन्हेगारांच्या तुलनेत महिलांची टक्केवारी केवळ ६ टक्के असली तरी त्यामध्ये वर्षागणिक वाढ होत आहे, ही गोष्ट नजरेआड करून भागणार नाही. तेव्हा महिलांपासून बच के रहना रे बाबा...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.