दुष्काळानं हातचं काम हिरावलं... जगायचं कसं?

मराठवाड्यातील दुष्काळानं भल्याभल्यांना देशोधडीला लावलंय. त्यात मजुरांची अवस्था तर अतशीय दयनीय झालीय. 

Updated: Dec 7, 2014, 11:47 PM IST
दुष्काळानं हातचं काम हिरावलं... जगायचं कसं? title=

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळानं भल्याभल्यांना देशोधडीला लावलंय. त्यात मजुरांची अवस्था तर अतशीय दयनीय झालीय. 

भल्या सकाळी, डोक्यावर पाण्याचा हंडा आणि हातात कपड्यात भाकरी गुंडाळून ग्रामीण भागातून महिला काम शोधण्यासाठी निघतात. करणार तरी काय... एरव्ही शेतात कामं करून या महिला संसाराचा गाडा हाकतात. मात्र दुष्काळानं शेतात पीकच उरलं नाही... परिणामी शेतात कामही नाही... त्यामुळं शेतीवर अलवंबून असलेल्या मजूरांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यात गावांत पाणीही मिळत नसल्यानं कुठं हंडाभर पाणी मिळालं तर तेही येताना घरच्यांसाठी त्या घेऊन येतात. दुष्काळानं या महिलांना अक्षरश: देशोधडीला लावलंय. यातल्या काही महिलांची स्वत:ची शेतीही आहे, मात्र परिस्थितीमुळं त्यांच्यावरही मजूर होण्याची वेळ आलीय.
  
ग्रामीण भागात रोजगार हमीची सुरू असलेली कामंही अपुरी पडलीयत. त्यामुळे मजुरांना याचाही फायदा होत नाही. मराठवाड्याचाच विचार केला तर ४९८ कामं रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय. तर उर्वरित १७५ कामांसाठी ८० कोटींच्या निधीची गरज आहे. रोजगार हमी योजनेवरून योजनेचं नाव महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी असं केलं. मात्र, प्रश्न काही सुटलेले नाहीत. काही भागात किरकोळ कामं सुरूही आहेत. मात्र नियमानुसार त्याठिकाणी दिवसभर राबल्यानंतर केवळ १६८ रुपये मिळतात, त्यासाठी वाट पहावी लागते. 
 
दुष्काळानं ग्रामीण भागाची रयाच गेलीय. लोकांच्या हातांना काम नाही आणि खर्च करण्यासाठी पैसैही नाहीत. त्यामुळं मिळेल ते आणि मिळेल त्याठिकाणी काम करण्याची दुर्देवी वेळ या मजुरांवर आलीय. दुष्काळी पॅकेजेसची घोषणा करताना किंवा बळीराजाला मदत करताना मजुरांचीही अडचण सरकारनं लक्षात घ्यावी एवढीच अपेक्षा... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.