पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पाणी कपात अखेर मागे

आता पुणेकरांना दर दिवशी पाणी मिळणार आहे. पुण्यात पाणीकपात रद्द करण्याच्या मुद्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. 

Updated: Aug 6, 2016, 09:42 PM IST
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पाणी कपात अखेर मागे title=

पुणे : आता पुणेकरांना दर दिवशी पाणी मिळणार आहे. पुण्यात पाणीकपात रद्द करण्याच्या मुद्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. 

मात्र या बैठकीआधी चांगलंच राजकीय नाट्य पाहायला मिळालं. आधी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घ्या मगच बैठकीत सहभागी होऊ अशी भूमिका, भाजप वगळता सर्वपक्षीय पालिका पदाधिका-यांनी घेतली. या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर भाजप वगळता सर्वपक्षीय नगरसेवकांनी आंदोलन केलं. त्यामुळे बैठकीच्या आधीपासूनच वातावरण तापलं. 

अखेर आमदार अनिल भोसले आणि शरद रणपिसे यांच्या विनंतीवरुन महापौर आणि गटनेत्यांनी आंदोलन मागे घेत बैठकीत सहभाग घेतला. बैठकीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, तसंच जिल्ह्यातले अनेक आमदारही उपस्थित होते. पुणे शहराला यापुढे रोज बाराशे एमएलडी पाणी देण्याचा निर्णय या बैठकीत घेतला गेला. 

पिंपरी चिंचवडकमध्येही पाणी कपात मागे

पिंपरी चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी. सलग पाच दिवस पावसाने धुव्वादार केलेल्या बेटिंगमूळ शहरवासीयांवरील पाणी कपात हटविण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळं येत्या सोमवार पासून शहरात रोज एक वेळ पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. 

शहरात सध्या दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र गेली पाच दिवस पावसाचा जोर कायम असल्यानं पवना धरणात २६ टक्क्याने वाढ होत, आज जवळपास ८७ टक्के पाणी साठा उपलब्ध झालाय. त्यामुळं पाणी कपात हटविण्याची घोषणा आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केली. आता रोज एक वेळ पाणी पुरवठा केला तर हा साठा जुलै २०१७ पर्यंत पुरणार आहे. 

दुसरीकडे शहराची तहान भागविणाऱ्या पवना धरणाचे सहा दरवाजे एक-एक फुटाणे उघडत, पवना नदीत दुपारपासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आलाय. यामुळं पवना नदी लगत राहणाऱ्या रहिवाश्याना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळं एकीकडं या पावसानं शहरवासीयांना पाणी कपात हटविण्याची खुशखबर दिली असताना, नदी लगत राहणाऱ्या रहिवाश्यांना मात्र सतर्कतेचा इशारा दिला आहे.