नवी मुंबई/औरंगाबाद : नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज संध्याकाळी पाच वाजता या निवडणुकीचा प्रचार संपेल.
गेल्या पंधरा दिवसांपासून नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. ऐन उन्हाळ्यात राजकीय धुळवड रंगली. प्रचारासाठी सुट्टीचे सलग दिवस म्हणून शनिवार आणि रविवार उमेदवारांना लाभले. त्यामुळे सर्व पक्षांचे दिग्गज नेते नवी मुंबईत होते.
नवी मुंबईतली रणधुमाळी...
शनिवारी अशोक चव्हाण आणि उद्धव ठाकरेंच्या सभा गाजल्या... तर सुपरसंडेला नवी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची सभा होती. सुट्टीचा रविवार, सर्वच राजकीय पक्षांनी उपयोगात आणला.
युवासेनेचे अध्यक्ष अदित्य ठाकरे यांनी ऐरोलीमध्ये रोड-शो केला. नवी मुंबईत नव्यानं निवडणूक लढवण्याऱ्या शेकापच्या उमेदवारांनीही प्रचार रॅली काढली. यात शेकापच्या ३५ उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. त्यांच्यासोबत माजी आमदार विवेक पाटील यांनीही मतदार राजाला साकडं घातलं. दुसरीकडे शिवसेनेच्या अपक्ष बंडखोर उमेदवारांनीही जोरदार प्रचार केला. आपलाच विजय होणार असा दावा शिवसेनेच्या या बंडखोर उमेदवारांनी केला.
औरंगाबादचं राजकारण...
दुसरीकडे औरंगाबादमध्येही सर्वच राजकीय पक्षांनी सर्व शक्ती पणाला लावत प्रचार केला. उद्धव ठाकरे, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण या नेत्यांच्या सभा औरंगाबादमध्ये झाल्या. तर औरंगाबादमध्ये महत्त्वाचा फॅक्टर असणाऱ्या एमआयएमचे नेते असदउद्दीन आणि अकबरुद्दीन या ओवेसी बंधूंच्या सभाही गाजल्या. औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंनी प्रचारसभेत शरद पवार यांच्यासह, एम आय एम च्या ओवेसी बंधूंवर जोरदार हल्ला चढवला. तर नवी मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेऊन, राष्ट्रवादीच्या गणेश नाईक आणि त्यांच्या घराणेशाहीवर टीकास्त्र सोडलं.
औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीपूर्वीच काँग्रेस राष्ट्रवादीने माघार घेतल्याचं चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा एक दिवसीय प्रचार दौरा वगळता काँग्रेसचा एकही मोठा नेता उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरकला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून केवळ विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्रचार केला. दरम्यान आज शेवटचा प्रचाराचा दिवस असुनही आतापर्यंत प्रचारकाळात काँग्रेस, राष्ट्रवादीचा एकही मोठा नेता प्रचारात उतरल्याचं दिसला नाही.
आता, अखेरच्या काही तासात मतदारांपर्यत पोहचण्यासाठी सर्व पक्षाचे उमेदवार, कार्यकर्त्यांची धावपळ पाहायला मिळणार आहे. २२ एप्रिलला दोन्ही पालिकांसाठी मतदान होणार असून २३ एप्रिलला मतमोजणी होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.