'मुका मोर्चा'वरुन नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार 'प्रहार'

राज्यात मराठा आरक्षणाबाबत निघणारे मराठे मोर्चे आणि शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या गोटात वादळ उठले. मात्र, हे वादळ क्षमण्याचे नाव घेत नाही. विरोधकांनी शिवसेनेला खंडीत पकडण्याची संधी सोडलेली नाही. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार 'प्रहार' केलाय.

Updated: Sep 29, 2016, 09:52 AM IST
'मुका मोर्चा'वरुन नारायण राणेंचा शिवसेनेवर जोरदार 'प्रहार' title=

ठाणे : राज्यात मराठा आरक्षणाबाबत निघणारे मराठे मोर्चे आणि शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्रामुळे शिवसेनेच्या गोटात वादळ उठले. मात्र, हे वादळ क्षमण्याचे नाव घेत नाही. विरोधकांनी शिवसेनेला खंडीत पकडण्याची संधी सोडलेली नाही. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार 'प्रहार' केलाय.

राणेंनी शिवसेनेला डिवचताना म्हटलंय, वृत्तपत्रात एखादी चूक झाली तर माफी मागण्यासाठी सुसंस्कृतपणा असावा लागतो. व्यंगचित्रासाठी उद्धव ठाकरे माफी मागण्यास तयार नसल्याने आता ‘सामना’तला शिपाई माफी मागणार आहे का, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित करीत शिवसेनेवर तोफ डागली.

मराठे कधीच इतिहास विसरत नाहीत. जखम भरून येते, पण व्रण तसेच राहतात, असे सांगत त्यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला. तसेच मराठा आरक्षणासाठी शिवसेनेने कधीच प्रयत्न केले नसल्याचा आरोप करीत योग्य वेळी मराठा मोर्चात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा गडकरी रंगायतनमध्ये बुधवारी आयोजित केला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. ठाण्यातील नगरसेवक आणि पदाधिकारी गळती थांबविण्याचा प्रयत्न करणार नाही, पण ठाण्यात ७० ते ७५ जागा जिंकेन, असा दावा राणे यांनी केला.