अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या सुरक्षारक्षकांच्या निवासाची व्यवस्था करण्याकरता महानगर पालिकेची शाळाच अन्यत्र हलवली जात असल्याचा आरोप होतो आहे. तर हा सरसंघचालकांच्या नव्हे तर मुख्यालयाच्या सुरक्षेचा विषय असल्याचा दावा महापौरांनी केलाय.
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपुरात असतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालयात वास्तव्याला असतात. नुकतीच सरकारनं त्यांना झेड प्लस सुरक्षा दिलीय. त्यादृष्टीनं त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बळाच्या जवानांची सुरक्षा मिळणाराय.
या जवानांच्या सोयीसाठी उंटखाना परिसरातली जागा दुसरीकडं हलवण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप विरोधकांनी केलाय. पालिकेत याबाबतचा प्रस्ताव पारित होण्याआधीच इमारत हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
तर ही सुरक्षा सरसंघचालकांसाठी नसून संघाच्या मुख्यालयासाठी असल्याचा दावा महापौरांनी केलाय.
एकीकडे हे आरोप-प्रत्यारोप होत असताना संघाने मात्र कधीही सुरक्षेची मागणी केली नव्हती आणि या वादात आपल्याला उगाचच ओढले जात असल्याची खंत संघ समर्थकांनी व्यक्त केली आहे. एकूणच संघाचं मुख्यालय दक्ष ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना मात्र दुसरीकडं संचलन करावं लागणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.