नागपूर : शेतीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने शेतकरी नाराज आहेत. त्याचाच फटका भाजपला बसेल असा दावा विरोधकांनी केला आहे. आगामी नगर परिषद निवडणुकीत सत्ता काबीज करण्याचं लक्ष भाजपचं असलं तरी वाटतो तेवढा हा प्रवास सोपा नक्कीच नाही. नागपुरातली काटोल नगर परिषद लक्षवेधी ठरणार आहे. काय वैशिष्ट्य आहेत इथली... कोण कुणाला आव्हान देऊ शकतं पाहूयात त्यासंदर्भातला रिपोर्ट.
काटोल नगर परिषद निवडणुकीत फॅमिली फाईट दिसणार आहे. देशमुख काका-पुतण्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तब्बल 22 वर्षे काटोलमध्ये सत्ता गाजवणा-या अनिल देशमुखांना 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुतण्याकडून पराभव स्वीकारावा लागला. आशिष देशमुखांनी भाजपच्या तिकिटावर बाजी मारली.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपनं 9 पैकी 7 जागांवर विजय मिळवल्यानं 2014 चाच ट्रेंड कायम असल्याचा दावा आमदार आशिष देशमुखांनी केलाय. काँग्रेस तर सोडाच, पण निवडणुकीच्या रेसमध्ये राष्ट्रवादी देखील कुठेच नसल्याचा दावा त्यांनी केलाय.
तर 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर अनेकांना विजय मिळाला असला तरी आता ती लाट ओसरल्याचा दावा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं केलाय. काटोलमध्ये चरणसिंह ठाकूर आणि राहुल देशमुखांच्या रुपानं स्थानिक नेते आणि त्यांचं प्रभाव क्षेत्र असलं तरी आपण कुणाशीही आघाडी करणार नसल्याचं राष्ट्रवादीनं स्पष्ट केले आहे.