लातूर : मुंबई-लातूर रेल्वे एक्सप्रेसच्या बिदरपर्यंत करण्यात आलेल्या विस्ताराचे तीव्र पडसाद लातूरमध्ये उमटत आहेत. लातूर रेल्वे स्थानकावर लातूर एक्सप्रेस रेल्वे बचाव कृती समितीतर्फे रेल रोको आंदोलन करण्यात आलं.
पंढरपूर-निझामाबाद रेल्वे यावेळी आंदोलकांनी रोखली. मात्र हे आंदोलन चिरडण्यासाठी आंदोलकांना रेल्वे स्थानकात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. ज्यामुळे अनेक आंदोलक स्थानकाबाहेरच होते. प्रचंड पोलीस बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता. त्यामुळे रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आलं होतं. या आंदोलनात काँग्रेसचे दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक अशा तीन आमदारांनाही आपला सहभाग नोंदविला होता.
मुंबई-लातूर या गाडीचा प्रवास कर्नाटकातील बीदपर्यंत वाढविण्याच्या रेल्वे खात्याच्या निर्णयावरून निर्माण झालेला वाद. यात राजकारण्यांनी तर उडी घेतलीच, पण बंद, आंदोलनही सुरू झाले. या वादापायी अस्मितेचा मुद्दा पुढे करून राजकीय पोळी भाजून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.
रेल्वे ही माणसे जोडण्याचे काम करते असा, दावा रेल्वे प्रशासन करत असले तरी प्रत्यक्षात रेल्वे विस्तारीकरणामुळे माणसे तोडण्याचे काम होते आहे. बीदरचे खासदार भगवंत खुब्बा यांनी मुंबईहून लातूरला येणारी लातूर एक्स्प्रेस सकाळी ७ पासून रात्री साडेदहापर्यंत लातूरच्या यार्डात नुसती उभी असते म्हणून ही गाडी बीदपर्यंत वाढविण्याची मागणी केली. लातूरची रेल्वे बीदपर्यंत नेण्यासाठी खासदार खुब्बा यांनी काही वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. दहा दिवसांपूर्वी प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर आठवडय़ातील तीन दिवस लातूरची रेल्वे बीदपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाचे जिल्हय़ातील उदगीर, देवणी, जळकोट, चाकूर, अहमदपूर या पाच तालुक्यांनी स्वागत केले, मात्र लातूरकरांनी याला तीव्र विरोध केला. प्रारंभी पालकमंत्री संभाजी पाटील यांनी विस्तारीकरणाला विरोध केला तर भाजपचे खासदार सुनील गायकवाड यांनी उदगीर, बीदर ही गावे पाकिस्तानात आहेत का, असा सवाल करत विस्तारीकरणास पाठिंबा दिला.
काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी या विस्तारीकरणाला विरोध दर्शविला. लातूर एक्स्प्रेस रेल्वे बचाव संघर्ष समिती स्थापन करून या समितीच्यावतीने आंदोलन छेडत सहय़ांची मोहीम, लातूर बंद व रेलरोको आदी कार्यक्रम करण्यात आले. लातूरला पहिल्यांदाच उस्मानाबादकरांनी साथ देत रेल्वे विस्तारीकरणाला विरोध करीत उस्मानाबादकरांनीही बंद पाळला.