नाशिक : एका आमदार महाशयांना मॉरल पोलिसिंग करण्याची हुक्की आली... आणि त्यांनी पोलिसांना हाताशी धरलं... त्यातूनच एका हॉटेलवर छापा पडला... पण डोंगर पोखरुन उंदीर निघाला.
नाशिक महापालिकेचे उप महापौर, महापौर आणि आता मोदी लाटेवर स्वार होऊन आमदारकी पदरात पडलेल्या भाजपचे आमदार बाळासाहेब सानप याचं कार्यक्षेत्र पंचवटी... कुठलीही गोष्ट आपण म्हणू तशीच झाली पाहिजे, हा साहेबांचा कायमच होरा राहिलाय...
सोमवारी पंचवटी परिसरातल्या एका हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची तक्रार आमदार साहेबांनी केली आणि त्यावरून पोलिसांनी छापा टाकला. मात्र, छाप्यात वेश्या नाही पण, आपल्या पत्नीसोबत आलेले नाशिक जिल्ह्यातले एक सरपंच सापडले. यावेळी, आमदार साहेबांनी सरपंचांच्या बायकोला चक्क 'वेश्या' ठरवून टाकलं.
आधी सरपंचांनीही गावठी इंगा दाखवण्याची तयारी दाखविली. मात्र ‘पॉलिटिकल रिलेशन’ जपत अखेर तक्रार न करण्याचा निर्णय घेतला.
हॉटेल व्यवसायिक किवा सरपंचाने तक्रार दाखल केली नसल्याने आमदाराविरुद्धच गुन्हा दाखल होता होता थोडक्यात बचावला. आमदाराने शिवीगाळ करत दबंगगिरी केल्याची चर्चा होती. मात्र भाजपला गवसलेले हे ‘बाळा’साहेब आपल्याया शिवी येतंच नाही, असं सांगतायत, तर पोलिसही आता छापा टाकला नसल्याचं सांगतायत.
आमदार महोदयांच निवासस्थान आणि कार्यक्षेत्र असणाऱ्या भूमीतच हे हॉटेल असल्यानं केवळ वेश्या व्यवसाय चालण्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यास पोलिसांना भाग पाडलं नसणार, त्याची इतरही वेगळी पार्श्वभूमी असण्याची चर्चा शहरात सुरु आहे.
सध्या तरी ह्या प्रकरणात कोणाच्याच हाती काही लागलं नसल्याने जणू काही घडलंच नसल्याची सारवासारव होतेय. मात्र, ही एक घटना आमदाराह सर्वांचा काही ना काही शिकवून गेली एवढं मात्र नक्की...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.