मुंबई : गुरुवारी रात्रीपासून मुंबईत मान्सूननं हजेरी लावलीय. दुपारनंतर मात्र पाऊस पुन्हा गायब झाला. त्यामुळं सकाळी पावसाच्या आणि दुपारी घामाच्या धारांनी मुंबईकरांना चिंब केलं. कोकणातही मान्सून दाखल झाला असला, तरी त्याच्या लपंडावामुळं शेतकरी चिंतेत आहे.
पाहुयात, या क्षणाला मान्सून महाराष्ट्रात कुठवर पोचलाय...
सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड या कोकणातल्या तीनही जिल्ह्यांत मान्सून पोचलाय.
मुंबई आणि ठाण्यातदेखील तो सक्रीय झालाय.
तर मध्य महाराष्ट्रात सातारा, सांगली आणि कोल्हापूरपर्यंत मान्सून पोचलाय.
हवामान खात्याला हुलकावणी...
हवामान खात्याला मान्सूननं पुन्हा हुलकावणी दिलीय. मात्र, यावेळी पावसानं दिलेला धक्का सुखद ठरलाय. मान्सून मुंबईत दाखल झालाय. मान्सूनचं आगमन एक आठवडा लांबण्याचं भाकित वर्तवून २४ तासही झाले नसताना मान्सूनचे ढग बरसले. रात्रभर सुरू असलेल्या संततधार पावसानंतर दुपारी हा 'मान्सून'च असल्याचं हवामान खात्यानं जाहीर केलंय. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक के.एस. होसालीकर यांनी ही माहिती दिलीय.
गेल्या २४ तासांत कुलाबा इथं २४ मिलिमीटर तर सांताक्रूझ इथं ८२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झालीय. उपनगरांमध्येही जोरदार पाऊस पडला. अंधेरीसह दादर, जोगेश्वरी, घाटकोपर या भागात चांगला पाऊस झाला. पश्चिम उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. तिथं सरासरी ३४ मिलिमीटर पाऊस झाला, तर पूर्व उपनगरांमध्ये ११ मिलिमीटर पाऊस झाला. सकाळच्या सुखद शिडकाव्यानंतर दुपारी मात्र पुन्हा एकदा ऊन्हाची झळ मुंबईकरांना जाणवू लागलीय. दरम्यान, मुंबईसह उत्तर कोकण, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.