बारामती : राज्यात नवी राजकीय समीकरणं उदयाला येतात की काय अशी स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चक्क बारामतीचा दौरा करणार आहेत. त्यांना खुद्द शरद पवारांनीच आमंत्रण पाठवलंय.
'बारामती पवारांची जहागिरी नाही, जनतेला गुलामगिरीतून बाहेर काढण्याचं आवाहन' नरेंद्र मोदींनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात बारामतीच्या जनतेसमोर केलं होतं. हे भाषण शरद पवारांच्या लक्षात नक्की असावं. मात्र, चारच महिन्यात हे चित्र पूर्ण पालटलंय. पवारांवर जहरी टीका करणारे नरेंद मोदी चारच महिन्यांनी पुन्हा बारामतीला येणार आहेत. तेही पवारांच्या निमंत्रणावरून…
14 फेब्रुवारी ही मोदींच्या दौऱ्याची संभावित तारीख आहे. त्याची तयारीही सुरु झालीय. पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात शरद पवार यांनी बारामतीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. पुण्याचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख या बैठकीला उपस्थित होते, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
विशेष म्हणजे या बैठकीलाही तांत्रिक अडचण होती. शरद पवार यांच्याकडे सध्या सत्तेचं कोणताही पद नाही. त्यामुळे, पवारांनी बोलावल्यानंतर हे अधिकारी त्यांच्याकडे बारामतीला बैठकीला जातील का? याबाबत शंका होती. ही बाब लक्षात आल्यानंतर खुद्द पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर ही अडचण घातली. त्यानंतर चक्र फिरली आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांच्यामार्फत या अधिकाऱ्यांना बारामतीला पवारांकडे बैठकीला जावे, अशा सूचना देण्यात आल्या.
त्यानुसार बारामतीमध्ये शरद पवार यांनी या अधिकाऱ्यांबरोबर नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याबाबत चर्चा केल्याची माहिती मिळतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संभावित दौऱ्यादरम्यान शेतकरी मेळावाही होणार आहे. यात मोदींचंदेखील भाषणही होईल. त्यावेळी मोदी पवारांवर टीका करतील, अशी शक्यता नक्कीच नाही. उलट, पवारांच्या कार्याचे, कर्तृत्वाचे गोडवेच नरेंद्र मोदींकडून ऐकायला मिळतील, अशीच शक्यता अधिक आहे. नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याने राज्यात नवीन राजकीय समीकरणं आकाराला येतील का…? तर, यावर आत्ताच काही भाष्य करणं अवघड ठरणार आहे…
मात्र, मोदींच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादीला एक फायदा नक्की होऊ शकतो. राष्ट्रवादीच्या घोटाळेबाज आणि सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकेलेल्या नेत्यांना या दौऱ्याचा निश्चित लाभ होऊ शकतो. राष्ट्रवादी किंवा भाजपने ते कितीही नाकारलं तरी, जनतेत हाच संदेश जाणार हे नक्की.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.