पुणे : पुण्यात पाच लाखात घर, या योजनेची नोंदणी सुरू असतांना मनसेच्या कार्यकत्यांनी मॅपलच्या कार्यालयात जावून घोषणाबाजी करत घरांचं रजिस्ट्रेशन बंद पाडलं आहे. चौकशीचे कुठलेही आदेश अजून मिळालेले नसल्याचं पुणे म्हाडाचे सीईओ आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितलं आहे.
गिरीश बापट, प्रकाश मेहता या मंत्र्यांबरोबरच मुख्यमंत्र्यांनीदेखील या योजनेच्या चौकशीची घोषणा केली आहे. मात्र त्यांनतरही बिल्डरने घरांसाठी नाव नोंदणी सुरूच ठेवली आहे.
रविवारी झी २४ तासने या संबंधित काही प्रश्न उपस्थित केले होते. स्वस्तात घर देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक तर होत नाही ना याबाबत आम्ही काही मुद्दे देखील उपस्थित केले होते.
घरांची नोंदणी सुरु होताच २ दिवसातच १०००० लोकांनी नोंदणी केली होती. म्हाडा जेव्हा घरांची लॉटरी काढते तेव्हा त्यांच्या अर्जाची फी ही ३०० ते ४०० पर्यंत असते पण या स्किममध्ये रजिस्ट्रेशन फी ही ११४५ रुपये घेऊन ते ही परत न मिळणारी रक्कम घेऊन कमाईचा वेगळा धंदा सुरु झालाय का असा प्रश्न झी २४ तासने उपस्थित केला होता. दोन दिवसात जर १०००० लोकांनी अर्ज भरले असतील तर 10000 x 1145 = 1,14,50000 रुपये आतापर्यंत जमा झाले असतील. त्यातही प्रत्येकाला घरं मिळतीलंच असं नाही.