...असं होतं महाराष्ट्रभर मनसे आंदोलनाचं चित्र!

मनसेच्या आजच्या आंदोलनात राज ठाकरे यांच्या अटक आणि सुटकेनंतर दादर आणि डोंबिवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 12, 2014, 05:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसेच्या आजच्या आंदोलनात राज ठाकरे यांच्या अटक आणि सुटकेनंतर दादर आणि डोंबिवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. महाराष्ट्रभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनानं चांगलाच पेट घेतलेला दिसला. ठाणे, कोल्हापूर, सोलापूर आणि औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांनी हंगामा केला.
मुंबई
दादर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात बंदचा चांगला प्रभाव पाहायला मिळाला. दादर, माहीम, शिवडी, परळ या भागातली बहुतांश दुकानं मनसैनिकांनी बंद पाडली.
दादरमध्ये पानेरी साडीचं दुकान बंद न केल्यान मनसैनिकांनी फोडलं. डोंबिवलीतही अशीच परिस्थिती होती. डोंबिवली शहरात मनसेचा चांगला जोर आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अटकेचं वृत्त येताच डोंबिवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. डोंबिवलीच्या मानपाडा रोड, बाजारपेठ, फडकेरोड या भागासह दूरच्या एमआयडीसी परिसरापर्यंत दुकानं बंद होती.
औरंगाबाद
मनसेच्या आंदोलनाचे परिणाम महत्त्वाच्या शहरांमध्ये ठळ्ळकपणे दिसून आले. राज ठाकरे यांनी शांततेनं आंदोलन करण्याच्या आवाहनाला हरताळ फासत औरंगाबादमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी वाहनांवर दगडफेकही केली.
चंद्रपूर
`चंद्रपूरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन करत चंद्रपूर-नागपूर महामार्ग ठप्प केला. पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अटक केली. 
अकोला
अकोल्यात कार्यकर्त्यांनी धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा मलकापूर गावाजवळ रोखून धरला होता. तब्बल तासभर या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. याशिवाय जिल्ह्यात पातूर, बाळापूर, मुर्तीजापूर, बार्शीटाकळी आणि अकोटसह अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन झालं.
यवतमाळ
यवतमाळमध्ये मनसेचं चक्काजाम आंदोलन पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे फसलं. जिल्ह्यात वणी आणि पुसद वगळता यवतमाळ शहर आणि इतर तालुक्यात मनसेला फक्त घोषणाबाजी करून आंदोलन गुंडाळावं लागलं.
वर्धा
वर्ध्यात मनसे कार्यकर्त्यांनी बजाज चौकात ढोल ताशे आणि आतिषबाजी करून राज यांच्या सुटकेचा आनंद व्यक्त केला. मनसे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वर्धा, सेलू, हिंगणघाट आणि देवळी तालुक्यात रस्ता रोको आंदोलनं केली.

  भंडारा
टोल बंद करण्या करिता संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता रोको करण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते त्यानुसार भंडारा येथे मानसेचे कार्यकर्ते रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन रस्ता रोको करण्याचा प्रयत्न उधळून लावला. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळपासूनच कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.