नागपूर : सर्वांचे लक्ष वेधणारा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय' वाघ गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. मात्र, त्याचा पत्ता लागत नसल्याने अखेर सीआयडीची मदत घेण्यात आली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वाघाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचे आदेश दिलेत.
आशियातील सर्वात मोठा वाघ अशा 'जय'ची ओळख आहे. जंगलात ‘जय’चे दर्शन होताच पर्यटकही समाधान व्यक्त करीत होते. तो अल्पावधीतच राज्यभरात प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे त्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांच्या या अभयारण्यात रांगा लागत होत्या.
'जय' गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असून त्याच्या शोधासाठी 100 हून अधिक जणांची मोहीम राबवली आहे. तो अचानक गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच 'जय'च्या हत्येच्या संशयावरून वनविभागाच्या अधिका-यांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील दोघांना ताब्यात घेतले होते. मात्र, ही माहिती खोटी असल्याचे वनमंत्र्यांनी स्पष्ट केले.