महाराष्ट्र सदन घोटाळा भोवला, दीपक देशपांडेंना घरचा रस्ता

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बांधकाम खात्यातील घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेले खात्याचे माजी सचिव दीपक देशपांडे यांना औरंगाबादच्या माहिती आयुक्तपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे. 

Updated: Jun 21, 2015, 10:57 AM IST
महाराष्ट्र सदन घोटाळा भोवला, दीपक देशपांडेंना घरचा रस्ता   title=

मुंबई/औरंगाबाद: राज्याचे माहिती आयुक्त दीपक देशापांडे याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित केलंय. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं देशापांडेविरोधात कारवाई सुरू केलीये. त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ACBला मोठं घबाड मिळालं होतं. तो माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा निकटवर्ती मानला जातो.

 दीपक देशपांडेला औरंगाबादच्या माहिती आयुक्तपदावरून बडतर्फ करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे केली आहे. या घोटाळ्यात आरोपी झाल्यानंतर देशपांडे स्वत:हून राजीनामा देतील अशी चर्चा होती, पण त्यांनी राजीनामा दिला नाही. दीपक देशपांडे यांच्या औरंगाबादमधील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून छापा टाकण्यात आला होता. यामध्ये तब्बल १.५३ किलो सोनं, २७ किलो चांदी आणि २ कोटी ६८ लाख रुपयांचे बॉण्ड्स आणि ठेवी इतकं मोठं घबाड सापडलं होतं. अखेर आज त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

माहिती अधिकार कायद्याच्या कलम १७/१ नुसार आता राज्यपाल सी. विद्यासागर राव हे देशपांडे यांना बडतर्फ करण्याची अनुमती सुप्रीम कोर्टाकडे मागतील. एकदा त्यांनी ही अनुमती मागितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यावर निर्णय देईपर्यंत देशपांडे यांना राज्यपाल निलंबित करू शकतात.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.