आईच्या ममतेपुढे बिबट्या हरला, नाशिकमधली थरारक घटना

मुलाच्या मानगुटीला पकडून त्याला नेणा-या बिबट्यानं आईच्या हंबरड्यापुढं शरणागती पत्करली आहे.

Updated: Oct 27, 2016, 06:55 PM IST
आईच्या ममतेपुढे बिबट्या हरला, नाशिकमधली थरारक घटना title=

नाशिक : मुलाच्या मानगुटीला पकडून त्याला नेणा-या बिबट्यानं आईच्या हंबरड्यापुढं शरणागती पत्करली आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये ही थरारक घटना घडली आहे.

अनिता गिते काही महिलांसोबत मक्याच्या शेतात कणसं काढण्याचं काम करत होत्या. त्यांचा चार वर्षांचा मुलगा वैभव शेतातच खेळत होता. मक्याच्या शेतात अचानक आलेल्या बिबट्यानं हे सावज बरोबर हेरलं. वैभववर झडप घालून आपल्या तीक्ष्ण जबड्यात त्याची मानगूट पकडली. त्याच्यासोबत खेळणा-या प्रियांकानं वाघ वाघ, दादा दादा अशी आरडाओरड सुरू केली.

वाचवा, वाचवा असा हंबरडा फोडत अनिता गिते बिबट्याच्या मागे धावत गेल्या. या माऊलीचा हा काळीज पिळवटून टाकणारा हंबरडा ऐकून बिबट्याही चपापला. सावज तसंच टाकून बिबट्या पळून गेला.

कोणताही प्रतिकार न करता, केवळ आईची आर्त हाक ऐकून बिबट्यानं आपल्या जबड्यातून वैभवला सहीसलामत सोडलं. वैभवला त्याच्या आईनंच पुन्हा एकदा जीवनदान दिलं.