विरोधामध्येच मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडलं

पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी ८ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं पुन्हा एकदा पाण्याचा वाद पेटलाय. मात्र नगरच्या नेत्यांच्या तीव्र विरोधानंतरही मुळा आणि भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. 

Updated: Dec 12, 2014, 12:00 PM IST
विरोधामध्येच मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडलं  title=

औरंगाबाद/अहमदनगर: पश्चिम महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यातून मराठवाड्यातल्या जायकवाडी धरणासाठी ८ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं पुन्हा एकदा पाण्याचा वाद पेटलाय. मात्र नगरच्या नेत्यांच्या तीव्र विरोधानंतरही मुळा आणि भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. 

गोदावरी पाटबंधारे महामंडळाचा पाणी सोडण्याचा निर्णय म्हणजे दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी मोठा दिलासा म्हणता येईल. मात्र दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला पाणी सोडण्यास नगर भागातल्या राजकारण्यांनी कडाडून विरोध केलाय. विशेष म्हणजे औरंगाबादचे माजी पालकमंत्री असलेल्या बाळासाहेब थोरातांना दुष्काळी स्थितीची कल्पना आहे. तरीही पाणी सोडण्यास तेच विरोध करतायत.

विरोधात आज माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शंकरराव गडाख यांनी नगर-औरंगाबाद रस्ता रोखून धरला होता. त्यामुळं काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. तर माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी निळवंडे धरणाच्या बांधावर ठिय्या आंदोलन केलं.

मराठवाड्यासाठी ८ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय अभ्यासाअंती घेण्यात आलाय. कुठल्याही भागावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन, गोदावरी पाटबंधारे आणि जलसंपत्ती प्राधिकरणानं हा निर्णय घेतलाय. मात्र नगरमधील नेते पाणी सोडण्यास विरोध करून मराठवाड्यावर अन्याय करत असल्याचा आरोप होतोय.

दरम्यान, गोदावरी विकास महामंडळाच्या आदेशानुसार आज मुळा धरणातून अकराशे क्युसेक्सनं तर भंडारदरा धरणातून ५ हजार क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरु आहे. हिवाळ्यात जर जायकवाडीला पाणी सोडलं तर उन्हाळ्यात नगरकरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल अशी भीती नगरच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या ३८ वर्षांपासून पाणीवादाचं हे भिजत घोंगडं कायम आहे. जायकवाडी प्रकल्पावर नियमानुसार ११५ टीएमसी क्षमतेची धरणं बाधण्याऐवजी १४६ टीएमसी पाणीसाठ्याची धरणं बांधण्यात आली. त्यामुळं वरच्या भागात पाऊस पडला तरी जायकवाडीत पाणी येतंच नाही. त्यात दुष्काळ आल्यानंतर सगळ्यांचेच डोळे उघडलेत. आता पाणीवाटपाचा वाद चव्हाट्यावर आल्यानंतर थातूरमातूर तोडगा काढण्यात आलाय. पण पिण्याच्या पाण्यावरून दोन विभागांमध्ये रंगलेलं असं राजकारण महाराष्ट्राच्या हिताचं नक्कीच नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.