कल्याण: ट्रेकिंगसाठी पुण्यातील जुन्नर मधील शिवनेरी गडावर गेलेल्या पर्यटकांच्या गाडीवर दरड कोसळल्यामुळं झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोन जखमी झाल्याची घटना माळशेज घाटातील छत्री पॉईंट जवळ घडली आहे. वेदांत नाईक (२१) आणि वल्लभ क्षेत्रमाळे (२१) अशी मृतांची असून ही दोन्ही तरूण विर्लेपार्लेचे रहिवाशी आहेत.
मुंबईतील विर्लेपार्लेमधील समर्थ प्रतिष्ठानचे ट्रेकर आज सकाळी शिवनेरी गडावर ट्रेकिंग साठी गेले होते. तीन बसमधून हे ट्रेकर संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास परतत असतांना परतीच्या प्रवासात बस छत्री पॉईंट जवळ पोचताच बस चालकाला दरड कोसळण्याचा अंदाज आला. यामुळं चालकानं बसचा वेग वाढवून बस वाचविण्याचा प्रयत्न केला.
मात्र शेवटच्या सीटवर ही दरड कोसळलीच यातील मधल्या बसच्या मागच्या बाजूला डोंगरातून आलेला मोठा दगड कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की हा दगड गाडीचं छत फोडून थेट मागच्या सीटवर बसलेल्या दोघांच्या डोक्यावर पडल्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाजूला बसलेले दोघेजण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. जखमींना कल्याणच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र दगड डोक्यात पडल्यामुळं वेदांत नाईक (२१) आणि वल्लभ क्षेत्रमाळे (२१) या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी जाहीर केलं. यामुळे काही काळ घाटात वाहतूक कोंडी झाली होती. टोकावडे आणि मुरबाड एमआयडीसी आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचार्यांनी तातडीनं ही दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
माळशेज घाटात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतच असतात. यात अनेकजण जखमी होतात तर अनेकांना जीव गमवावा लागतो. मात्र तरीही यावर राज्य शासनाकडून अद्याप कोणतीही उपाय योजना करण्यात आलेली नाही. यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्याच दिवशी ही दुर्घटना घडल्यामुळं या मार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.