कोल्हापूर : दख्खनचा राजा अशी ख्याती असणा-या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेची आज मुख्य दिवस आहे. 'ज्योतिबाच्या नावानं चांगभलं... केदारनाथाच्या नावानं चांगभलं...' अशा गजरात कोल्हापूर जिल्ह्यातल्या वाडी रत्नागिरी अर्थात ज्योतिबाच्या डोंगरावर भाविकांनी गर्दी केलीय.
कामदा एकादशीपासून या यात्रेला सुरुवात होते. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा आणि गुजरात राज्यातले भाविक मोठ्या संख्येनं ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झालेत. मानाच्या सासनकाठ्या आणि गुलाल-खोबऱ्याच्या उधळणीमुळे ज्योतिबाचा डोंगर गुलालानं न्हावून निघालाय. आज दुपारी सासनकाठ्यांची मिरवणूक निघणार आहे.
श्री क्षेत्र ज्योतिबाला पुरातन इतिहासाचा संदर्भ आहे. याचा उल्लेख करवीर महात्म्यात आढळतो. रत्नासूर नावाच्या राक्षसानं वाडी रत्नागिरी पर्वतावर हाहाकार माजवला होता.. त्यावेळी महालक्ष्मी देवीनं रत्नासुराला मारण्यासाठी रवळनाथ केदार म्हणजे ज्योतिबाला पाठवलं. ज्योतिबा आणि रत्नासुरामध्ये झालेल्या घनघोर युद्धात ज्योतिबा रत्नासुराचा शिरच्छेद करतो, असा उल्लेख पुराणकथांमध्ये आढळतो.
ज्योतिबाची ही यात्रा चार दिवस चालते. या यात्रेदरम्यान ज्योतिबाचा डोंगर गुलालाच्या रंगात न्हाऊन निघतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.