कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत २७ गावांचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चाललाय. निवडणुकींवर बहिष्कार टाकण्यावर ठाम असलेली संघर्ष समिती आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे २७ गावांतील मतदार आणि इतर पक्षांची चांगलीच गोची झाली आहे. अशातच संघर्ष समितीच्या या पवित्र्याचा शिवसेनेला फायदा होणार की नुकसान याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : एकाच क्लिकवर निवडणुकीच्या बातम्या
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत यंदा सर्वात जास्त मुद्दा गाजतोय तो २७ गाव संघर्ष समितीचा. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या २७ गावांच्या मुद्दयांवर "संघर्ष मेळावा" घेवून २७ गाव संघर्ष समिती भाजपची असल्याचे स्पष्ट केले. ते काय कमी होते म्हणुन २७ गाव संघर्ष समितीने जाहीररित्या भाजपच्या उमेदवारांना पाठींबा जाहीर केला.
या सगळ्यामुळे शिवसेना विरुद्ध इतर पक्ष असा थेट संघर्ष निर्माण झालाय. संघर्ष समितीतील वादामुळे सेनेला फायदा होत होता असं वाटतं असताना एकाएकी भाजप आणि संघर्ष समितीच्या या खेळीमुळे सेनेसह मित्र पक्षांची गोची झाली आहे. आता २७ गावांतील एकूण २१ पैकी फक्त १७ ठिकाणी निवडणूका होत आहेत. त्यापैकी संघर्ष समितीने भाजपच्या १० उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलाय. तर ५ ठिकाणी संघर्ष समितीने स्वत:चे उमेदवार उभे केलेत आणि २ ठिकाणी मनसेला संघर्ष समितीने पाठिंबा दिलाय.
आकडेवारीत शिवसेना विरुद्द इतर पक्ष दिसतायेत पण, संघर्ष समितीच्या भाजप पाठिंबा भूमीकेमुळे मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांना धड उघड विरोध ही करता येत नाही आणि बोलता ही येत नाही अवस्था झाली आहे. आता या २७ गावात संघर्ष समितीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्द शिवसेना असा कलगीतुरा रंगलाय. शिवसेना मात्र संघर्ष समितीला धूळ चारु असा विश्वास व्यक्त करत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.