'जय'चाही कॉलर आयडी काढून त्याला जमिनीत पुरलंय?

गेल्या एक वर्षांपासून विदर्भाचा सेलिब्रिटी टायगर 'जय' बेपत्ता असतानाच, आता त्याचा छावा श्रीनिवास मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. यावरुन वाघांची सुरक्षा आणि वन विभागाचा हलगर्जीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. 

Updated: Apr 29, 2017, 11:42 AM IST
'जय'चाही कॉलर आयडी काढून त्याला जमिनीत पुरलंय? title=

अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : गेल्या एक वर्षांपासून विदर्भाचा सेलिब्रिटी टायगर 'जय' बेपत्ता असतानाच, आता त्याचा छावा श्रीनिवास मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. यावरुन वाघांची सुरक्षा आणि वन विभागाचा हलगर्जीपणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. 

नागपूरच्या उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील सेलिब्रिटी टायगर जय मागच्या वर्षी १८ एप्रिल पासून बेपत्ता आहे. त्याचा शोध अजूनही सुरूच असल्याचा दावा वन विभागातर्फे होत असतानाच आता त्याचा ३ वर्षाचा बछडा श्रीनिवास मृत्युमुखी पडला. शेतीला लावलेले विजेचे कुंपणामुळे ज्याप्रकारे श्रीनिवासचा मृत्यू कारण झाला त्याच प्रकारे तर जयचा मृत्यू झाला नाही ना हा प्रश्न आता उघडपणे विचारला जातो आहे. 

जयच्या बेपत्ता होण्यामागे वन विभागाचे दुर्लक्ष जवाबदार असल्याची खंत 'वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडिया'च्या रिजनल हेड प्रफुल भांबूरकर यांनी व्यक्त केलीय. वाघाला बघण्याकरता ज्या देशात लोक अनेक दिवस वाट बघतात त्या देशात असे दुर्लक्ष दुर्दैवी असल्याचे देखील ते म्हणाले. 

विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडलेल्या श्रीनिवासला तेथील शेतकऱ्याने शेतात पुरले. पुरताना त्याने श्रीनिवासची रेडिओ कॉलर दूर फेकली होती. एका वर्षांपासून बेपत्ता असलेल्या जयचा मृत्यू अश्याच प्रकारे झाला असेल आणि कदाचित त्याला रेडिओ कॉलर सहित शेतीत पुरले असेल ही आशंकादेखील व्यक्त केली जाते आहे. कारण रेडिओ कॉलर जमिनीत पुरली असले तर त्याचे सिग्नल मिळणार नाहीत. वन्य प्राण्यांमुळे शेतीचे अतोनात नुकसान होते. ते टाळण्याकरता शेतकरी आपल्या कुंपणात वीज प्रवाह सोडतो. वन्य जीवांपासून होणाऱ्या नुकसानाला टाळण्याकरता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई योजना बळकट करावी लागेल, असं मत वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाचे संचालाक नितीन देसाई आणि पर्यावरणवादी संस्थांनी केली आहे.  

पुढच्या पिढीला वाघ दिसावा असे वाटत असेल तर राज्य सरकार आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी एकत्रपणे काम करणे गरजेचे आहे. अन्यथा जय आणि श्रीनिवास असेच बेपत्ता ही किंवा त्यांचा मृत्यू होईल आणि त्याची दाखल घेणारे देखील कुणी नसेल.