Exclusive : हिरवंगार कोकण आता भगवं

सिंधुदुर्गातलं राजकारण गेल्या नऊ वर्षांत पूर्णपणे बदलून गेलंय, राजकीय समीकरणं झपाट्यानं बदललीयत. नाथ पै, मधु दंडवते ते कोकणात शिवसेना... शिवसेना ते काँग्रेस आणि काँग्रेस ते शिवसेना असं एक वर्तुळ पूर्ण झालंय.

Updated: Nov 29, 2014, 09:12 PM IST
	Exclusive : हिरवंगार कोकण आता भगवं  title=

मुंबई : सिंधुदुर्गातलं राजकारण गेल्या नऊ वर्षांत पूर्णपणे बदलून गेलंय, राजकीय समीकरणं झपाट्यानं बदललीयत. नाथ पै, मधु दंडवते ते कोकणात शिवसेना... शिवसेना ते काँग्रेस आणि काँग्रेस ते शिवसेना असं एक वर्तुळ पूर्ण झालंय.

हिरवंगार कोकण आता भगवं होतंय आणि तेच सुख याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी उद्धव ठाकरेंचा नुकताच कोकण दौरा पार पडला. हा राजकीय दौरा नाही, हे त्यांनी स्वतःच स्पष्ट केलं होतं. ज्या कोकणात एकेकाळी शिवसेना नेत्यांची फिरकायचीही बिशाद नव्हती, त्याच सिंधुदुर्गानं शिवसेनेला भक्कम साथ दिली.... त्यांचं आभार मानण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौ-याचा पहिला मान कोकणाला दिला.

वैभव नाईक, दीपक केसरकर, उदय सामंत, सदानंद चव्हाण, राजन साळवी शिवसेनेचे हे पाच विजयवीर थाटामाटात लाल मातीतून निवडून आले. याच समाधानानं उद्धव ठाकरेंनी गणपतीपुळेपासून कुणकेश्वर ते आरोंद्याची सातेरीदेवी या सगळ्या देवदेवतांचे सपत्नीक नवस फेडले. उद्धव ठाकरेंचा हा तसा पर्यटन दौराच होता. पितापुत्रांनी मनसोक्त फोटोग्राफी केली आणि कोकण दौरा एन्जॉय केला पण यानिमित्तानं कोकणातल्या गेल्या नऊ वर्षांचा इतिहास पुन्हा ताजा झाला.

२००५ ची ती पोटनिव़डणूक ऐतिहासिक ठरली. सिंधुदुर्गात दबदबा होता तो फक्त नारायण राणे या नावाचा. माझं नाव शिवसेना, असं म्हणत रस्त्यावर फिरण्याची त्याकाळी कुणातही धमक नव्हती. शिवसेनेत प्रचंड अन्याय झाल्याचं मार्केटिंग राणेंनी अचूक केलं. आणि आपल्या नेत्यावर अन्याय झाल्याचं सिंधुदुर्गवासीयांच्या गळी उतरवलं. घरची परिस्थिती हलाखीची असली तरी चालेल पण कोकणवासियांना सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर तो स्वाभिमान.

आणि हीच स्वाभिमानाची लढाई जिंकत नारायण राणेंनी २००५ च्या पोटनिवडणुकीत तब्बल ६५ हजारांचं मताधिक्य मिळवलं. पण अवघ्या चार वर्षांत राणेंचा दबदबा कमी होत गेला. आणि २००९ मध्ये राणेंचं मताधिक्य २३ ते २४ हजारांवर आलं. तीच नारायण राणेंसाठी पहिली धोक्याची घंटा होती.... खरं तर नारायण राणे. हा टिपिकल कोकणी माणूस. फणसासारखा. त्यांनी सिंधुदुर्गाला भरभरुन दिलं. रस्ते केले, योजना आणल्या, घराघरांत पाणी आणलं. या कोकणाच्या जीवावर राणे स्वतः श्रीमंत झालेच. पण कोकणालाही वैभव मिळवून दिलं.

पण या सगळ्याला हळूहळू ओहोटी लागत गेली.जमिनींच्या व्यवहारांचे आरोप नारायण राणेंवर झाले, काँग्रेसमध्ये मनानं कधीच न रमलेल्या राणेंचा पक्षांतर्गत संघर्ष सुरूच होता. त्यातच राणेंची चिडचिड वाढत गेली. आणि एकेकाळी राणेंचा ज्या सिंधुदुर्गात दबदबा होता, तो दहशतवाद कसा आहे, याचा प्रचार राजकीय विरोधकांनी सुरु केला. परिणामी राणेंची पकड हळूहळू ढिली होत गेली. 

२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनं त्यावर शिक्कामोर्तब केलं. लोकसभा निवडणुकीत नीलेश राणेंचा पराभव झाला. तर खुद्द नारायण राणे विधानसभा निवडणूक हरले. कदाचित पराभवाची कुणकुण राणेंना आधीच लागली होती.... म्हणूनच त्यांनी मुलाचं करिअर सेट करण्यासाठी सेफ गेम खेळत नितेशला कणकवलीतून उभं केलं.... आता निर्ढावलेल्या समर्थकांमुळे आपण गोत्यात आलो, की पुत्रप्रेमामुळे जनतेनं साथ सोडली, नक्की काय चुकलं, याचा विचार नारायण राणेंनी गांभीर्यानं करायला हवा.

कोकणच्या भूमीत राणेंचा पराभव झाला आणि नऊ वर्षांनी कोकणात शिवसेनेचं दमदार कमबॅक झालं. २००५ च्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या नेत्यांना सभेसाठी मैदानं मिळवायलाही सिंधुदुर्गात संघर्ष करावा लागत होता, त्याचवेळी टोपीवाला ग्राऊंडवर झालेल्या सभेत बाळासाहेबांनी कोकणवासीयांसमोर अक्षऱशः दंडवत घातला होता. पण त्या दंडवताला झुगारुन कोकणची माणसं राणेंच्या पाठीशी उभी राहिली. २००५ हे वर्षं शिवसेनेसाठी प्रचंड खडतर ठरलं.

नारायण राणे आणि राज ठाकरे ही दोन मोठी बंड शिवसेनेनं पचवली. पण राजकीय समीकरणं अशी काही बदलली की शिवसेनेच्या या दोन्ही कट्टर विरोधकांचा २०१४ मध्ये दारुण पराभव झाला. कोकणच्या लाल मातीनं शिवसेनेला कौल दिला. अर्थात यासाठी शिवसेनेनं जैतापूरविरोधात घेतलेली भूमिका हा मैलाचा दगड ठरली.... भाजपलाही शिवसेनेनं तग धरु दिला नाही. आता या हिरव्यागार कोकणात भगवा फडकत राहील, याची काळजी शिवसेनेला घ्यावी लागेल. आणि आपलं नेमकं काय चुकलं, याची उत्तरं नाराय़ण राणेंना तातडीनं शोधावी लागतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.