येवल्याच्या गोल्ड मॅनने घेतली बिग बींची भेट

Updated: Apr 6, 2015, 09:43 PM IST

पाहा व्हिडिओ

येवला : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांना भेटण्याची अनेकांना इच्छा असते. प्रत्येकाची इच्छा पूर्ण होतेच असे नाही. पण येवला नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अर्थात गोल्ड मॅन पंकज पारख हे अपवाद ठरले आहेत. महानायकाला भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली अन् त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. मुंबईत बिग बीशी त्यांची भेट झाली. 

अवघ्या २२ मिनिटांच्या या भेटीने पंकज पारख कृतकृत्य, धन्य झाले आहेत. हौसेसाठी कोण काय करेल याचा नेम नसतो....,येथील उपनगराध्यक्ष पंकज पारख यांनी असेच हौसेखातर तब्बल एक कोटी चाळीस लाख ९२ हजार रुपये किमतीचा चार किलो वजनाचा सोन्याचा शर्ट तयार करून घेतला आहे. आपल्या वाढदिवशी त्यांनी हा शर्ट परिधान केला होता. याची चर्चा देशभर झाली होती. चार किलो सोन्याचा शर्ट, चांदीचा बुट, अंगठ्या असे तब्बल साडेपाच किलो सोने अंगावर परिधान करून अनोखा विक्रम केला आहे. यावर दोन जपानी लघुपटही काढण्यात आले आहेत.

आता या हौसेची दखल खुद्द अमिताभ बच्चन यांना घ्यावी वाटली आहे. सिनेअभिनेता रमेश देव यांच्याकडून जेव्हा पारख यांच्याविषयी माहिती मिळाली तेव्हाच बच्चन यांनी होकार देत वेळही दिला होता. 

मुंबईतील जुहू येथील बच्चन यांच्या निवासस्थानी दोन दिवसांपूर्वी ही भेट झाली. संध्याकाळी साडेपाच वाजेची वेळ मिळाली असल्याने बंगल्यात वेळेतच प्रवेश करताच पारख यांना वेगळी अनुभूती आली. अगोदर गप्पागोष्टी करून विचारल्या त्या प्रश्‍नाला उत्तर देण्याच्या तयारीत गेलेल्या पारख यांना प्रत्यक्ष भेट झाल्यावर काय बोलावे हेच समजेना..., दोन्ही हात जोडून 'नमस्कार जनाब..., आपका स्वागत..!' असा पहाडी अन् नम्र आवाज कानावर येताच पारख यांनी हात जोडत नमस्कार घातला. पण काय बोलावे याचा अंदाज येण्यापूर्वीच खास सोन्याचा शर्ट बनवल्याबद्दल बिग बीने आश्‍चर्य व्यक्त केले. 

बॉडीगार्डकडील भली मोठी बॅग पाहत हा शर्ट परिधान करण्याच्या सूचना बच्चन यांनी केल्या. आप बनाते हो? क्यो बनवाया? कबसे सोने की चाहत हे यासह कुठून बनवला? डीजाइनर कोण? किती दिवस लागले याविषयी बिग बी ने आस्थेने अन नम्रतेने विचारणा केली. 

पारख परिवारासोबत असल्याने जोडी अच्छी है असे आवर्जून सांगत मनमोकळे पणाने फोटोसेशनही त्यांनी केले. जेवढया नम्रेतेने ते बोलले तेवढ्याच आदबीने निरोप घेत बच्चन निघाले पण आपल्या नावाचे कुतूहल मागे ठेऊनच...! 

माणूस जितका मोठा तितका तो नम्र असतो हे मला बच्चन यांच्याकडून शिकायला मिळाले. खरे तर बच्चन यांच्यासारख्या उत्तुंग माणसाला भेटण्यासाठी अनेकांनी हयातभर तपश्चर्या केली, तरीही हे शक्य झाले नाही. पण माझी सोन्याची आवड मला ३५ वर्षापासून ज्या नायकाला मी मानतो त्याकडे घेऊन आली याचे मोठे समाधान असल्याचे पंकज पारख यांनी सांगितले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.