नागपूर : नागपुरात रोज गंभीर गुन्हे घडत असताना नागपूरचे पोलीस मात्र ठाण्यात जुगार खेळत बसत असतील तर याला काय म्हणावे? असाच प्रकार नागपुरच्या शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये उघडकीस आलाय.
कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक शांततेच्या दृष्टीने शांतीनगर परिसर अत्यंत संवेदनशील मानला जातो. मात्र, अशा संवेदनशील भागात कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी असलेले पोलीस त्यांच्या कर्तव्याविषयी किती संवेदनशील आहेत, हे या दृश्यांमध्ये दिसून येतंय.
शांतीनगर पोलीस ठाण्यात हे दृश्यं दिसून आलं. या घटनेचा व्हिडिओ नागपुरात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये याच पोलीस ठाण्यातील चार कर्मचारी जुगार खेळात बसलेले दिसत आहेत.
या जुगारात पत्त्यांचा एकेक डाव संपल्यानंतर पैशांची देवाणघेवाणही होत आहे. एव्हढंच नाही तर एकमेकांशी कोणावर किती पैसे शिल्लक आहे असे हिशोबही हे कर्मचारी करताना दिसत आहेत.
या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे नाव प्रकाश आणि प्रमोद आहे. पोलीस ठाण्यात सुरु असलेल्या या जुगाराचे हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या विषयावर शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्यासोबत बोललो. त्यांनी हे कर्मचारी त्यांच्याच पोलीस ठाण्यातील असल्याचं मान्य केलंय. आम्ही या विषयाची चौकशी करू असं सांगून त्यांनी प्रतिक्रिया देणं मात्र टाळले.