रत्नागिरी : परदेशात नोकरीची सुवर्णसंधी... अशी जाहिरात पाहून नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करणार असाल तर सावधान...
कारण, ओएलएक्सवरील अशाच जाहिरातीमुळं रत्नागिरीतल्या दोन तरुणांना तब्बल दहा लाखांचा फटका बसलाय. काही दिवसांपूर्वी अमित ओतारी आणि त्याच्या मित्रानं ओएलएक्सवर परदेशात नोकरी असल्याची जाहिरात पाहिली.
संबधित जाहिरातीमधल्या नंबरवर फोन करुन त्यानं आपला रेझ्युम इ-मेल केला. काही वेळातच चांगल्या पगारावरील नोकरीसाठी अमेरिकेतल्या एका कंपनीनं शॉर्ट लिस्ट केल्याचं त्याला सांगण्यात आलं.
मात्र, त्यासाठी पाच लाख सर्विस चार्ज लागेल असं सांगण्यात आलं होतं. परदेशातल्या नोकरीच्या आमिषापोटी अमितनं ते पैसे भरले आणि विनय कांबळे नावाच्या व्यक्तीकडून अॅग्रीमेंट मिळवलं. मात्र, दिल्लीतल्या अमेरिकन वकिलातीला संपर्क केला असता फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.
फसवणूक करणारा 'मनसे'शी संबंधित
विनयकडे वारंवार तगादा करुनही पैसे परत न मिळाल्यानं अमित आणि त्याच्या मित्रानं पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी विनय कांबळेला अटक केली. धक्कादायक म्हणजे, अटकेनंतर विनय कांबळे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबधित असल्याचं समोर आलंय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत.