नववर्षाचा पहिलाच दिवस... वाघिण आणि बिबट्याचा बळी...

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जगात दुर्मिळ होत चाललेल्या वाघीणीचा आणि बिबट्याचा बळी गेलाय. चंद्रपुरातल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झालाय. तर कोल्हापुरात वनविभागाच्या ढिसाळपणामुळं बिबट्याचा दुर्दैवी अंत झालाय.

Updated: Jan 1, 2015, 10:03 PM IST
नववर्षाचा पहिलाच दिवस... वाघिण आणि बिबट्याचा बळी...  title=

चंद्रपूर / कोल्हापूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जगात दुर्मिळ होत चाललेल्या वाघीणीचा आणि बिबट्याचा बळी गेलाय. चंद्रपुरातल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झालाय. तर कोल्हापुरात वनविभागाच्या ढिसाळपणामुळं बिबट्याचा दुर्दैवी अंत झालाय.
  
कोल्हापुरात रुईकर कॉलनी इथं पकडलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झालाय. सकाळी तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला पकडण्यात यश आलं होतं. बिबट्याला जंगलात सोडायला जात असताना बिबट्याचा वाटेतच मृत्यू झाला. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या घराच्या परिसरात आज सकाळी बिबट्या शिरला होता. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले. वन विभागाचे अधिकारी फार उशिरा घटनास्थळी पोहोचले.. एवढंच नव्हे तर चुकीच्या पद्धतीनं त्यांनी या बिबट्याला जाळ्यात पकडलं... त्याला गाडीत चढवतानाही अतिशय वाईट पद्धतीनं हाताळण्यात आलं. वन विभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी योग्य यंत्रणा नसणं, त्याला बेशुद्ध करण्यासाठी साहित्य नसणं ही वनविभागाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. त्यातच आता या बिबट्याचा मृत्यू झाल्यानं वनखात्याच्या ढिसाळ कारभारावर शिक्कामोर्तब झालंय...

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूरमध्ये मृतावस्थेतली वाघिण आढळली. जगप्रसिध्द ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवरील ताडोबा बफर क्षेत्रात असलेल्या मुधोली-काटवल या गावाच्या रस्त्यादरम्यान किनगाव-बोडी येथे तीन वर्षे वयाची ही वाघीण रस्त्यालगत मृतावस्थेत आढळली आहे. आज सकाळी ग्रामस्थांना ही घटना दृष्टीस पडताच तातडीने या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. हे अत्यंत घनदाट जंगल असून यात अंतर्गत भागात गावांची वस्ती आहे. सोबतच या भागाला मानव-वन्यजीव संघर्षाची पार्श्वभूमी आहे. वनविभागाचे अधिकारी व तज्ञांनी या मृतदेहाची तपसणी केली असता विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वाघिणीच्या नाकातून रक्तस्त्राव दिसत असून तोंडातून फेस आलेला दिसत आहे. या वाघिणीचा मृतदेह फुगला आहे. या उमद्या जनावराची विषबाधा करत शिकार केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. २०१४ या एका वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात ३ वाघांचे मृत्यू नोंदविले गेले आहेत. तर २०१५ च्या पहिल्याच दिवशी पट्टेदार वाघिणीचा संशयास्पद मृत्यू वनविभागाची झोप उडवून गेला आहे.

धक्कादायक म्हणजे, २०१४ मध्ये एकूण ६४ वाघांचा मृत्यु झालाय. यापैंकी सर्वाधिक १५ मृत्यु तमिळनाडूमध्ये झालेत. तर मध्य प्रदेशात गेल्या वर्षी १४ वाघांचा बळी गेलाय. २०१० च्या गणनेनुसार देशात एकूण १७०६ वाघ शिल्लक आहेत. २०१४ साली झालेल्या गणनेची आकडेवारी अजून जाहीर झालेली नाही. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं ही माहिती दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.