नाशिकमधून भाजीपाल्याची थेट परदेशात निर्यात

कांदा, द्राक्ष आणि डाळिंबाच्या नगरीतून थेट भाजीपाला निर्यात सुरु झाली आहे. गेल्या वर्षभरात शंभर कोटीहून अधिक उलाढांल निर्यातदारांनी केली आहे. 

Updated: Dec 9, 2014, 08:18 PM IST
नाशिकमधून भाजीपाल्याची थेट परदेशात निर्यात title=

नाशिक : कांदा, द्राक्ष आणि डाळिंबाच्या नगरीतून थेट भाजीपाला निर्यात सुरु झाली आहे. गेल्या वर्षभरात शंभर कोटीहून अधिक उलाढांल निर्यातदारांनी केली आहे. 

हिरवे पालेभाज्य आणी फळभाज्या  जागतिक बाजारपेठेत जाऊ लागल्याने नाशिकच्या शेतकऱ्याला फायदेशीर दर मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता नाशिक केवळ मुंबईची नव्हे तर देशाची परसबाग म्हणून ओळख निर्माण होणार आहे.  

नाशिकजवळचं हलकॉन कार्गो. या कार्गोतून भाजीपाला थेट परदेशात जातो. दर्जेदार उत्पादनामुळे जिल्ह्यातली फळं आणि भाज्यांना आखातासह इतर देशांत  चांगली मागणी आहे. पेठ, सुरगाणासारख्या आदिवासी भागात वांगी , फ्लॉवरचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. आखाती देशांमध्ये सौदी अरेबिया, इराण, इराक, इजिप्त, दुबई या देशांमध्ये हा भाजीपाला जातो.

एक जूनपासून ४३३७ मेट्रिक टन कोबी आणि १०३० मेट्रिक टन शिमला मिरची  सौदी आणि दुबईमध्ये निर्यात झालीय़. ५५८ मेट्रिक टन भेंडी इंग्लंड, जर्मनी, नेदरलंडमध्ये, तर ४६४ मेट्रिक टन मिरची इटली, इंग्लंडला पोहोचलीय. ४७१ मेट्रिक टन टॉमेटो गल्फ, ओमान आणि पाकिस्तानमध्ये, तर ४६१ मेट्रिक टन बीट आणि १९० मेट्रिक टन कोबी रशियात निर्यात झालाय. १०५ मेट्रिक टन गाजरं रशियाला आणि २७० मेट्रिक टन मका इंग्लंड आणि गल्फमध्ये गेलाय. 

नाशिकमध्ये भाजीपाल्याचं वर्षाकाठी सरासरी ३० लाख मेट्रिक टन इतकं उत्पादन होतं. नाशिक बाजार समितीतली वर्षाकाठीची आवक - दीड कोटी क्विंटल इतकी असते. तर भाजीपाल्याची उलाढाल साधारण सव्वा पाच कोटी रुपयांच्या घरात असते.
 
कृषी पणन महामंडळ आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून नाशिकमध्ये निर्यातीसाठीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार आहे. देशातल्या भाजीपाल्यापैकी तीन टक्क्यांपेक्षाही  कमी  भाजीपाला निर्यात होतो. त्यामुळे त्याचा थेट परिणाम देशांतर्गत ग्राहकावर होण्याचीही शक्यता नाही. उलट शेतकऱ्याला आपल्या उत्पादनाचा चांगला भाव मिळण्यात या निर्यातीनं मदतच होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.