तरुणांनो सावधान, तुम्हालाही ढाब्यावर भांडी घासावी लागतील!

नोकरीचं अमीष दाखवून युवकांना बळजबरीनं, मारहाण करुन वेगळ्याच कामाला जुंपणारी टोळी अस्तित्वात असल्याचं समोर आलय. चंद्रपुरातील दोन युवकांबरोबर हाच प्रकार घडलाय, त्यातील एकानं आपली कशीबशी सुटका करुन घेतलीय. 

Updated: Jan 22, 2016, 10:46 PM IST
तरुणांनो सावधान, तुम्हालाही ढाब्यावर भांडी घासावी लागतील! title=

चंद्रपूर : नोकरीचं अमीष दाखवून युवकांना बळजबरीनं, मारहाण करुन वेगळ्याच कामाला जुंपणारी टोळी अस्तित्वात असल्याचं समोर आलय. चंद्रपुरातील दोन युवकांबरोबर हाच प्रकार घडलाय, त्यातील एकानं आपली कशीबशी सुटका करुन घेतलीय. 

या घटनेनंतर या प्रकरणी पोलीस मात्र तक्रार दाखल करून घेण्यास नकार देत आहेत. योगेश गुजरकर (२०), आकाश भोयर (१९) हे  चंद्रपूरचे २ युवक नोकरी शोधण्यासाठी काही महिन्यांपूर्वी पुण्यात गेले. पुणे रेल्वे स्थानकावर त्यांना काही एजंट भेटले. त्यांनी कॅटरींगचं काम देतो सांगत या दोघांना सोलापूरला नेले. मात्र प्रत्यक्षात मोरूची-नातेपुते हायवेवर असलेल्या गारवा हॉटेलमध्ये त्यांना भांडी घासायच्या कामाला जुंपलं. योगेश आणि आकाशनं त्याला नकार दिला, तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिथेच डांबून ठेवलं गेलं. 

आपली सुटका करण्याचे या दोघांनी अनेक प्रयत्न केले. मात्र ते सारे फोल ठरले. अखेर आपल्या जीव धोक्यात टाकत योगेश तिथून कसाबसा निसटला आणि तब्बल १८ किलोमीटर धावत त्याने शिंगणापूर गाठलं. तिथून बसने पुण्याला येऊन तो ३ दिवसांनी चंद्रपूरला पोहोचला. हॉटेलमध्ये कोंडून ठेवलेले २० युवक असल्याची माहिती योगेशने दिली आहे.

दरम्यान, योगेशसोबत असलेल्या आकाश भोयरची सुटका झाली नसल्याने त्याच्या आईने चंद्रपूरचे रामनगर पोलीस ठाणं गाठलं. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिलाय. यासाठी पोलिस हद्दीची भाषा करत आहेत. युवकांची फसवणूक करुन त्यांना मारहाण करुन त्यांना अशा प्रकारे कैदेत ठेवण्या-या या टोळीचा पर्दाफाश होणं आणि त्यांच्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी होत आहे.