नाशिकच्या गडावर मनसे की ‘नवनिर्माण’?

सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय त्या नाशिकच्या महापौरपदाची आज निवडणूक होणार आहे.  नाशिकमधली सत्ता मनसे राखणार की नाशिकमध्ये नवनिर्माण होणार? याची उत्सुकता आहे.  

Updated: Sep 12, 2014, 09:49 AM IST
नाशिकच्या गडावर मनसे की ‘नवनिर्माण’? title=

नाशिक : सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय त्या नाशिकच्या महापौरपदाची आज निवडणूक होणार आहे.  नाशिकमधली सत्ता मनसे राखणार की नाशिकमध्ये नवनिर्माण होणार? याची उत्सुकता आहे.  

नाशिकमध्ये भाजप-शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मनसे-काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये खलबतं सुरू आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीत महाआघाडी स्थापन करण्याचा विचार मनसे-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आहे. 

मात्र, महापौरपदासाठी मनसे आणि राष्ट्रवादीतच चुरस निर्माण झाली आहे. मनसेनं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी आग्रही भूमिका राष्ट्रवादीनं मांडली आहे. गेल्या अडीच वर्षात मनसेनं काहीही कामं केली नाहीत. त्यामुळं आत्मपरिक्षण करण्याचा सल्लाच राष्ट्रवादीनं मनसेला दिलाय. त्यामुळं आता राज ठाकरे, माणिकराव ठाकरे आणि छगन भुजबळांच्या पातळीवरच आघाडीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 
 
राज ठाकरेंचा हात मुर्तडकांच्या पाठिशी...
दरम्यान, एकीकडे आघाडीशी चर्चा सुरू असतानाच मनसेमध्ये अंतर्गत घडामोडींनाही वेग आलाय. शशिकांत जाधव, अशोत मुर्तडक, सुदाम कोंबडे, सलीम शेख या चौघांनी अर्ज भरले आहेत. 

यात राज ठाकरेंनी मुर्तडक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची सूत्रांची महिती आहे. आघाडीचा पाठिंबा घ्यायचा असेल, तर त्या दृष्टीनंही उमेदवाराची ही निवड महत्त्वाची ठरणार आहे.

‘चमत्कार घडवणार...’
एकीकडे काँग्रेस आघाडी आणि मनसेमध्ये खलबतं सुरू असतानाच नाशिकमध्ये नव्यानं एकत्र आलेले शिवसेना-भाजपलाही विजयाचा आत्मविश्वास आहे.

यावेळी महापालिकेत आपण चमत्कार घडवणार असल्याचा दावा शिवसेनेचे नगरसेवक आणि नेते करतायत. हा चमत्कार नेमका काय असेल, ते आज स्पष्ट होईल. दरम्यान, शिवसेनेच्या नगरसेवकांना ठेवण्यात आलेल्या अज्ञात स्थळी ‘झी 24 तास’नं प्रवेश मिळवलाय. आजच्या मतदानात आखले जाणारे डावपेच याच ठिकाणी शिजले आहेत. आता त्याला यश मिळतं का, हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.