उस्मानाबाद : राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार सुरू झाला असताना उस्मानाबादेत मात्र काँग्रेसच्या सोनेरी मेजवानीची चर्चा रंगली होती. पक्षाच्या प्रचाराची सुरूवात जिल्ह्यातल्या येणेगुरच्या सभेनं काल झाली.
या सभेला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंदीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील चाकूरकर आणि उस्मानाबाद लातूर जिल्हयातील सर्व आजी माजी आमदार उपस्थित होते. सभेला 3 तास उशिर झाला होता आणि त्यावेळी हे सर्व वरीष्ठ नेते एका कार्यकर्त्याच्या बंगल्यावर मेजवानी करत होते.
या कार्यकर्त्यानं नेत्यांसाठी सोन्याची ताटं-वाट्या-भांडी ठेवल्याची जोरदार चर्चा सभास्थानी रंगली होती. कार्यकर्ते उन्हातान्हात बसून असताना नेतेमंडळी सोन्याच्या ताटात मेजवानी झोडत असल्याबद्दल काही कार्यकर्त्यांनी संतापही बोलून दाखवला.
कार्यकर्ता उपाशी आणि नेते मंडळी तुपाशी अशी अनेकांची भावना झाली. मात्र झी 24 तासच्या प्रतिनिधीनं याबाबत खात्री केली असता ती केवळ सोनेरी रंगाची मिश्र धातूची भांडी असल्याचं उघड झालं. आता ही ताटंवाट्या सोन्याची असल्याची चर्चा कुणी आणि का पसरवली हा प्रश्न असताना नेत्यांसमोर खोट्या प्रतिष्ठेपायी चाललेला कार्यकर्त्यांचा आटापिटा या घटनेमुळे अधोरेखित झालाय.