डीडीसीए घोटाळा : शरद पवारांनी घेतली अरुण जेटलींची बाजू

डीडीसीए घोटाळा प्रकरणी कीर्ती आझाद यांनी पत्रकार परिषदेतून उठवलेली आरोपांची राळ या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पाठिंबा दिलाय.

Updated: Dec 24, 2015, 06:04 PM IST
डीडीसीए घोटाळा : शरद पवारांनी घेतली अरुण जेटलींची बाजू title=

पुणे : डीडीसीए घोटाळा प्रकरणी कीर्ती आझाद यांनी पत्रकार परिषदेतून उठवलेली आरोपांची राळ या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पाठिंबा दिलाय.

एका कार्यक्रमात बोलताना अरुण जेटली चुकीचे काम करणार नाहीत, त्यांच्या बरोबरीच्या लोकांनी काही केलं असेल तर त्यावर त्यांनी लक्ष ठेवायला हवं होतं हे खरं, असं पवारांनी म्हटलंय.

दरम्यान, निलंबित कीर्ती आझाद आज संध्याकाळपर्यंत निलंबनाच्या नोटीशीला उत्तर देणार आहेत. त्यासाठी आपल्याला सुब्रह्मण्यम स्वामी मदत करणार असल्याचं जाहीर करून आझाद यांनी आपली बाजू भक्कम केली आहे.

कीर्ती आझाद यांनी डीडीसीएत झालेल्या गैरव्यवहारावरुन जेटलींवर पत्रकार परिषदेत आरोप केल्यानं त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उचलणं गैर आहे का, असा सवाल करत या प्रकरणी पंतप्रधान लक्ष घालतील, असा विश्वास आझाद यांनी व्यक्त केला.

दरम्यान, ना खाऊंगा ना खाने दुंगा, असा नारा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राज्यात डीडीसीएच्या घोटाळ्याबद्दल आवाज उठवणारा खासदारच निलंबित झालाय. यावर मोदी गप्प का? असा सवाल आज काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाय.