हिंगोली : हिंगोलीमध्ये राष्ट्रीय पिक विमा कंपनीनं पिक विम्याचे केवळ ६ रुपये देऊन बळीराजाची क्रूर चेष्टा केल्याचं वृत्त झी मीडियानं दाखवलं. यावर सरकारला जाग आली असून या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिलंय.
हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांच्या खात्यावर ज्वारीसाठी प्रती हेक्टरी फक्त सहा रुपये आणि उडीद पिकासाठी प्रती हेक्टरी केवळ १७६ रुपये जमा करून क्रूर थट्टा केली आहे. गेल्या वर्षभरापासून एका पाठोपाठ एक अस्मानी संकटानं शेतकरी कोलमडलाय. अशाच स्थितीत राष्ट्रीय पिक विमा कंपनीनं बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. पिक विम्याचे केवळ ६ रुपये देऊन बळीराजाची थट्टा करण्यात आली आहे.
जुलै २०१३ मध्ये खरीपाच्या हंगामात निसर्गाचं बदलते रूप बघून पिकांच्या स्वरक्षणासाठी हजारो रुपये खर्च करून शेतक-यांनी शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय पिक विमा काढला होता. जुलै २०१३ मध्ये मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आणि पिकांचं होत्याच नव्हत झाल होतं.
विमा कंपनीने दीड वर्षानंतर मध्यवर्ती सहकारी बँकांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकलेत. हिंगोली जिल्ह्यातील शेतक-यांच्या खात्यावर ज्वारीसाठी प्रती हेक्टरी फक्त सहा रुपये आणि उडीद पिकासाठी प्रती हेक्टरी केवळ १७६ रुपये जमा करून क्रूर थट्टा केली आहे.
नुकसानीचं सर्व्हेक्षण करायला आलेल्या अधिका-यांचा चहापाण्याचा खर्च सहा रुपयांपेक्षा जास्त झाला असेल. सरकारी कामकाजाची असंवेदनशिलता, बेफिकीरपणाच यातून समोर येतोय.
कळमनुरी येथील सगळ्याच शेतक-यांना एवढाच पिक सुरक्षा विमा मिळालाय. पण हे कुठल्या निकषाच्या आधारे मिळाले यापासुन खुद्द बँकेचेच अधिकारी अनभिज्ञ आहेत. बळीराजाची पिळवणूक सुरु असताना शेतकरी संघटनांनीही विमा कंपन्यांना दणका द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.
खोटया भूलथापा देऊन शेतक-यांची फसवणुक करणा-या विमा कंपनीवर शिवसेना फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहे. शेतक-यांच्या प्रश्नांवरुन तुटून पडणा-या नेत्यांनी हिवाळी अधिवेशनात तरी हा मुद्दा उपस्थित करुन हिंगोलीतल्या बळीराजाची व्यथा सरकार दरबारी मांडावी. कष्टकरी शेतक-याची अवहेलना कधी थांबणार हाच खरा प्रश्न आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.