चंद्रपूर : आज १० मे रोजी बुद्धपौर्णिमेला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्राणीगणना होत आहे. दरवर्षी होणा-या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी वन्यप्रेमींनी एकच गर्दी केली आहे. ही प्राणीगणना ताडोबाच्या गाभा आणि बाह्य क्षेत्रात केली जाणार असून, त्यासाठी लोखंडी आणि लाकडी मचाणं उभारण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत २४ तास या मचाणांवर बसून प्राण्यांची गणना करायची असते.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बाह्य क्षेत्रात वन्यजीवांची संख्या किती आहे, त्यांचा वावर कोणकोणत्या भागात आहे, कोणता प्राणी कुठे दिसतो, याची माहिती संकलित करण्याच्या उद्देशानं ही प्राणीगणना केली जाते. वन्यजीवप्रेमींची एक पिढी घडविण्यासाठी सर्व टीका सहन करून असे अभियान राबविण्याची वनविभागाची ही जुनी कवायत आहे.
या प्रक्रियेला शास्त्रीय मान्यता किंवा आधार नसला तरी ढोबळमानानं प्राण्यांची कल्पना यावी, यासाठी ती दरवर्षी बुद्धपौर्णिमेला केली जाते. याहीवर्षी ती आज होत आहे. बुद्धपौर्णिमेला चंद्र नेहमीपेक्षा अधिक प्रकाशमान असतो. त्यामुळं दिवस-रात्र मचाणीवर बसून प्रगणकांना प्राण्यांची गणना करावी लागते. यावेळी ताडोबा व्यवस्थापनानं विशेष सोयी केल्या आहेत.