कोल्हापूर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शिरोळचे माजी आमदार सा. रे. पाटील यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. बेळगावमधील के.एल.इ. हॉस्पिटलमध्ये १ महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
आप्पासाहेब उर्फ सादगोंडा रेवगोंडा पाटील म्हणजेच सा.रे. पाटील काँग्रेसचा सर्वात 'तरूण' चेहरा होते. त्यांचं पार्थिव आज सकाळी साडेनऊपर्यंत शिरोळमध्ये आणण्यात येईल. सकाळी ९.३० वाजता दत्त शुगर साखर कारखाना याठिकाणी सा. रे. पाटील यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या अखेरच्या इच्छेनुसार त्यांचं पार्थिव दान करण्यात येणार आहे. मिरजच्या मेडिकल कॉलेजमध्ये हे देहदान करण्यात येईल
नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील सर्वात ज्येष्ठ उमेदवार सा. रे. पाटील यांनी तीनवेळा आमदारकी भूषवली आहे. एकदा समाजवादीकडून तर दोन वेळा काँग्रेसकडून ते विधानसभेत पोहोचले.
शिरोळ तालुक्यातील जांभळी हे सा रे पाटलांचं गाव. सा रे पाटील हे महात्मा गांधींच्या विचारांनी भारला गेलेला एक सच्चा शेतकरी. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करावी म्हणून त्यांनी काम केलं. यातूनच त्यांनी १९४६ मध्ये जांभळीत विविध सेवा सोसायटी स्थापन केल्या. त्यांनी शिरोळमध्ये १९७० साली श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याची स्थापनाही केली.
सा. रे. पाटील हे पहिल्यांदा १९५७ मध्ये आमदार झाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.