पाहा, महाराष्ट्रभरातील विविध ढंगात रंगलेली होळी!

'झी २४ तास'च्या प्रेक्षकांना आणि '२४तासडॉटकॉम'च्या वाचकांना होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा... 

Updated: Mar 6, 2015, 08:50 AM IST
पाहा, महाराष्ट्रभरातील विविध ढंगात रंगलेली होळी! title=

मुंबई : 'झी २४ तास'च्या प्रेक्षकांना आणि '२४तासडॉटकॉम'च्या वाचकांना होळीच्या आणि धुळवडीच्या खूप खूप शुभेच्छा... 

संपूर्ण देशभर आज धुळवड साजरी होईल... पद्धती वेगवेगळ्या पण, उत्साह मात्र सारखाच... महाराष्ट्रातही होळीच्या आणि धुळवडीच्या विविध पद्धती पाहायला मिळतात... पाहुयात, कुठे कशी साजरा होतो हा सण... 

रत्नागिरी : शिमगोत्सवाला सुरुवात
 कोकणात शिमगोत्सव जल्लोषात साजरा होतोय. रत्नागिरीचे ग्रामदैवत असलेल्या भैरी मंदिरातही मध्यरात्रीपासून रत्नागिरी शहराच्या शिमगोत्सवाला प्रारंभ झालाय. मध्यरात्री हजारो रत्नागिरीकरांच्या साक्षीनं रत्नागिरीच्या या शिमगोत्सवाला सुरुवात झालीय. रत्नागिरी जवळच्या मिऱ्या गावातील ग्रामदेवतांच्या पालख्या रत्नागिरी शहराच्या ग्रामदैवत असलेल्या भैरी देवस्थानच्या भेटीकरता आल्या. रत्नागिरीतल्या भैरीच्या मंदिराच्या भेटीला दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्री या पालख्यांची भेट होते. यावेळी ग्रामदेवतेच्या प्रांगणात होणारी ही पालख्यांची भेट पाहण्याकरता रत्नागिरीकर मोठ्या संख्येनी उपस्थित होते... वर्षातून एकदा ग्रामदेवतेच्या पालख्यांची ही भेट घडली की सर्व पालख्या आपल्या निश्चित मार्गानं शिमगोत्सव साजरा करण्याकरता रवाना होतात. रत्नागिरीच्या ग्रामदेवतेची पालखी बारा वाड्यांमध्ये फिरण्याकरता रवाना होते. पुढील काही दिवस रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात हा शिमगोत्सव याच जल्लोषात साजरा होताना पहायला मिळेल.

सावर्डेचा 'होल्टे होम'  

सावर्डेमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने होळी उत्सव साजरा केला जातो.. होळीचे नऊ दिवस होळी पेटवून दहाव्या दिवशी सकाळी होम पेटवण्याची प्रथा आहे. मात्र, सावर्डे इथं होम लागण्याच्या आदल्या दिवशी रात्री होळी खेळण्याची परंपरा होल्टे होम नावाने सुरु आहे. होल्टे होम म्हणजे जळलेले लाकूड एकमेंकाच्या अंगावर भिरकावण्याची प्रथा...
 
वेंगुर्ले डोडामार्गाचा ऐतिहासिक होळी उत्सव
सिंधुदुर्गात होलिकोत्सवाला सुरुवात झालीय. कोकणात माडाचे झाड़ होळी म्हणून पेटवलं जातं. कोकणातल्या होळीसाठी चाकरमानी खास रजा टाकून येथे दखल होतात. चार दिवस हा होळी उत्सव चालतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण वेंगुर्ले डोडामार्ग भागातील होळी उत्सव ऐतिहासिक मानला जातो...

कुलस्वामिनीचा होळी उत्सव
अमरावतीच्या कुलस्वामिनी श्री अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिरासमोर होळीचा उत्सव साजरा करण्यात आला. गेल्या तीनशे वर्षापासून इथं हेट्याचं झाड आणि श्रीफळ बांधून होळी साजरी केली जाते.

लेंगीगीतातील होळी!
अकोल्यात बंजारा समाज अनोख्या पद्धतीने होळी साजरी करतो.. लेंगीगीताच्या माध्यमातून नाचत गात गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव साजरा केला जातो.. बंजारा समाजाचा संघर्ष, शिक्षणाचं महत्त्व, व्यसनमुक्ती किंवा मग वात्रटिका अशा स्वरुपात ही गाणी असतात. बंजारा समाजाच्या होळीत पाल,गेर, फगवा अशा अनेक परंपरा जोपासल्या जातात.

तांड्यावरची होळी!
यवतमाळमध्येही होलिकोत्सवातून बंजारा समाजाच्या संस्कृतीचं दर्शन घडतं.. बंजारा स्त्री-पुरुष एकत्रित येऊन वर्तुळाकार गोल नाचतात. यावेळी परंपरागत मौखिक गाणी, डफावर लोक समुहाचा नृत्यमय आविष्कार, पारंपरिक वेशभूषा, केशभूषा हे इथल्या तांड्यावरचं विशेष आकर्षण ठरतं. होलिकोत्सवावेळी म्हटल्या जाणा-या लेंगी गीतातून समाज प्रबोधनही केलं जातं.

नंदूरबारची ९०० वर्षांची परंपरा
नंदुरबार जिल्ह्यातील काठी इथं नऊशे वर्षाची परंपरा असलेली होळी मोठ्या उत्साहात पार पडली.. पारंपरिक वेश परिधान करुन नृत्य सादर करत आदिवासी बांधवांनी होळी साजरी केली... 

चंद्रपूरातली अनोखी होळी
संपूर्ण देशात सर्वाधिक प्रदूषित शहर अशी ओळख असलेल्या चंद्रपूर शहरात वेगळ्या पद्धतीने होळी दहन करण्यात आली. चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव सध्या एकोर्निया या जलपर्णीमुळे प्रदूषित झालाय. याच जलपर्णींची चंद्रपूरच्या सामाजिक संस्थांनी होळी करत प्रशासनाचा निषेध केला. 
लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी देशवासियांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्यात.. होळी हा रंगांचा सण असून वाईट विचारांचे दहन करुन चांगल्या विचारांनं जीवन फुलू द्या असा संदेश त्यांनी देशवासियांना दिला.. तसंच विदर्भ ही संस्कार दीक्षाभूमी असल्याचं त्या म्हणाल्यात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.