अखिलेश हळवे, नागपूर : नागपुरात मोठ्या प्रमाणावर चीनी फटाके विकले जात असल्याचं समोर आलंय. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी लाखो रुपयाचे चीनी फटाके जप्त केलेत.
चीनी फटाक्यांना बंदी असतानाही नागपुरात चायनीज फटाके विकले जात होते. चीनी फटाके प्रदूषणात वाढ करतातच, पण त्याचबरोबर आरोग्यावरही विपरीत परिणाम करतात. या फटाक्यांमध्ये विषारी पदार्थाचा वापर होतो.
नागपूरमध्ये विविध ठिकाणी धाडी टाकत पोलिसांनी दीड लाखांपेक्षा जास्त किमतीचे फटाके जप्त केलेत. नागपूर पोलिसांनी गेल्या काही दिवसांत शहराच्या तहसील, अजनी, हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चीनी फटाके जप्त केलेत.
या चीनी फटाक्यांवरची पोलिसांची कारवाई सुरूच राहणार आहे. पण चीनी फटाके आरोग्यावर वाईट परिणाम करतात, त्यामुळे जनतेनंही चीनी फटाके घेऊ नयेत, असं आवाहन पोलिसांनी केलंय.