आशीष अम्बाडे, झी मीडिया, राजुरा : नगरपालिकांच्या मतदानाची चंद्रपूर जिल्ह्यात धामधूम सुरु असतांनाच आज राजुरा येथे झालेल्या एका प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार असलेले बाबाराव मस्की आज सकाळ पासून कर्नल चौक येथे असलेल्या खाजगी मोबाईल टॉवर वर चढून बसले. बाबाराव मस्की हे प्रखर विदर्भवादी असून या आधी सुद्धा ते विदर्भाच्या मागणी साठी असे प्रकार करून चुकले आहे.
टॉवरवर चढलेल्या मस्की यांनी तिथे जाऊन स्वतंत्र विदर्भाचे जोरजोरात नारे लावायला सुरुवात केली आणि विदर्भाच्या निर्मिती साठी मला निवडून द्या आणि त्यांचं निवडणूक चिन्ह असलेल्या सिलेंडर समोरचं बटन दाबा असं लोकांना आवाहन करू लागले. मस्की हे टॉवरवर चढल्याची माहिती मिळाल्यावर प्रशासनाने त्यांना खाली येण्याची विनंती केली मात्र बाबाराव काहीही ऐकत नसल्याचे पाहून प्रशासनाने त्यांना समजविण्याचा नाद सोडून दिला.
मात्र मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रचार केला या सबबीखाली बाबाराव मस्की यांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिका-यांनी आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. बाबाराव मस्की हे मतदान झाल्यावर म्हणजे संध्याकाळी टॉवर खाली येण्याची शक्यता आहे.