नाशिक : दिल्ली निकालानंतर राज्यात शिवसेना आणि भाजपत कलगीतुरा सुरु झालाय. संकटकाळी पाठीशी उभा असतो, तोच खरा मित्र असतो अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मित्रपक्षाची कानउघडणी केलीये.
दुसऱ्याच्या घरात मूल झाल त्याचा आपणच जास्त आनंद करायचा नसतो, अशा शब्दात आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील भाजपच्या पराभवावरील प्रतिक्रियेच्या उत्तरात सांगितले.नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीतील दीक्षांत समारंभाला आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया नोंदविली.
दिल्लीतल्या भाजपचा दारूण पराभवावर उद्धव ठाकरे यांनी दिले्ली प्रतिक्रिया आणि आजच्या सामानतल्या अग्रलेखावर मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोले लगावलेत. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला, तर तो उद्धव ठाकरे यांचा पराभव ठरतो का, असा सवाल फडणवीसांनी केलाय. दिल्लीतल्या पराभवाची जबाबदारी पंतप्रधान मोदींची नसल्याचं ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर संजय राऊत यांनी प्रतिहल्ला केलाय. संकटकाळी कोण कोणाच्या पाठीशी उभं राहिलंय, याचा इतिहास तपासावा, असं राऊत म्हणालेत. शिवसेनेकडून केलं जाणारं प्रत्येक विधान टीका आहे असं समजू नका. त्यातून आत्मपरीक्षण करा, असा उपदेशवजा टोला शिवसेनेचे नेते आणि सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना लगावलाय.
त्याचवेळी सत्तेत राहायचं की नाही याचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील आणि शिवसैनिकापासून नेत्यापर्यंत प्रत्येकाला तो मान्यच असेल, असं स्पष्टीकरणही दादा भुसे यांनी दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.