भाजप-शिवसेना कुरघोडीचं राजकारण आता जिल्हा परिषद, नगर पालिकांमध्येही

केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता असली तरी दोन्ही पक्षांमध्ये नेहमीच कुरघोडीचं राजकारण नेहमीच सुरु असतं. त्याचीच री कार्यकर्ते आता जिल्हा परिषद किंवा नगर परिषदांमध्ये ओढताना दिसताहेत. 

Updated: Jun 15, 2015, 10:18 PM IST
भाजप-शिवसेना कुरघोडीचं राजकारण आता जिल्हा परिषद, नगर पालिकांमध्येही title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी: केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता असली तरी दोन्ही पक्षांमध्ये नेहमीच कुरघोडीचं राजकारण नेहमीच सुरु असतं. त्याचीच री कार्यकर्ते आता जिल्हा परिषद किंवा नगर परिषदांमध्ये ओढताना दिसताहेत. 

दोन्ही पक्ष सत्तेत असलेल्या रत्नागिरी नगर परिषदेतही आता शहरात नव्यानं बांधण्यात आलेल्या उद्यानच्या लोकार्पण सोहळयावरुन कुरघोडीचं राजकारण सुरु झालंय. भाजपचे नगराध्यक्ष विरुद्ध शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी असा नवीन वाद सुरु झालाय.

रत्नागिरी शहरात नव्यानं बांधण्यात येत असलेल्या या उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यावरून नगरपरिषदेत शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगलाय. समाजसेवक कै. रघुनाथ तथा बाबुशेठ संसारे उद्यान ज्या प्रभागामध्ये आहे तो प्रभाग आहे शिवसेनेचे नगरसेवक उमेश शेट्ये यांचा. शेट्ये यांनी स्वत:च निमंत्रण पत्रिका छापून या सोहळयासाठी राज्यमंत्री दिपक केसरकर, खासदार, आमदार, नगराध्यक्ष आदींना निमंत्रित केलंय. 

मात्र शेट्ये यांनी कुठलाही राजशिष्टाचार न पाळता घरचा कार्यक्रम असल्याप्रमाणं या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचा आरोप भाजप नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी केलाय. तसंच कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याची भूमिका घेतलीय आणि दिवाळीत पुन्हा या उद्यानाचं उदघाटन करणार असल्याचं जाहीर केलंय.

तर हा कार्यक्रम कुणाच्या घरचा नसून, भाजप नगराध्यक्षांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा असं म्हणत भाजपवर पलटवार केलाय. 

त्यामुळे भाजप नगराध्यक्षांनी बहिष्कार टाकलेल्या सोहळ्याला राज्यमंत्री आणि खासदारांसह इतर निमंत्रित हजेरी लावतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.