इथं सर्पदंश झाल्यास डॉक्टरकडे नाही तर मांत्रिकाकडे नेतात

भंडाऱ्यात सर्पदंश झाल्यानंतर गावकरी डॉक्टरांकडे न जाता होमहवन करण्यात धन्यता मानतायत. अंनिसनं यासंदर्भात कारवाईची मागणी केलीय.

Updated: Aug 24, 2015, 11:45 PM IST
इथं सर्पदंश झाल्यास डॉक्टरकडे नाही तर मांत्रिकाकडे नेतात title=

माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा: भंडाऱ्यात सर्पदंश झाल्यानंतर गावकरी डॉक्टरांकडे न जाता होमहवन करण्यात धन्यता मानतायत. अंनिसनं यासंदर्भात कारवाईची मागणी केलीय.

तुम्हाला सर्प दंश झालाय?
सापांचा बंदोबस्त करायचाय?
मग बोलवा मांत्रिकाला...

भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातल्या मांदेड गावातल्या लोकांनी हेच केलं... गावातल्या 30हून अधिक लोकांना सर्पदंश झाल्याची घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून सर्पदंश होतो आणि तो साप अदृष्य होतो अशी गावकऱ्यांची समजूत झाली. त्यातूनच ग्रामस्थांनी डॉक्टरांकडे जाण्याऐवजी चक्क मांत्रिकांना बोलवलं. या मांत्रिकांनीही गावातल्या मुख्य मंदिरासमोर होमहवन केला. आता आपण बरे होऊ, असा या भोळ्याभाबड्या ग्रामस्थांचाही समज आहे.

हा मांत्रिक नेमकं काय करतो, याबाबत आम्ही त्याला विचारलं. तेव्हा मंत्राद्वारे आपल्याला सापाचं विषही उतरवता येतं, असा दावा मांत्रिकानं केला.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं मात्र अशा भोंदूबाबांवर कारवाईची मागणी केलीय.
झी मीडियाची टीम जेव्हा याबाबतचं चित्रीकरण करण्यास गेली, तेव्हा आम्हाला मनाई करण्यात आली... महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा झाला. मात्र भंडाऱ्यातल्या या भोळ्या गावकऱ्यांना पाहिल्यानंतर, अंधश्रद्धा नेमकी थांबणार तरी कधी, असा प्रश्न निर्माण होतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.